पत्रकारांचे कर्तव्य काय असावे या संदर्भात त्यांनी 27 सप्टेंबर 1904 रोजी केसरीच्या अंकात प्रकाशित केलेले विचार आज देखील तंतोतंत लागू पडतात. ते म्हणतात, सरकारवर कडक टीका केल्याने त्यांचा रोष आमच्यावर झाला तर त्याची आम्हास पर्वा नाही. सरकारच्या जुलमी राज्यपद्धतीवर कडक टीका करावयाची नाही तर वर्तमानपत्र काढावे तरी कशाला? …सारांश आमची मते व भाषा कितीही कडक असो तो मनाचा धर्म आहे.

1818 साली बाजीराव दुसरा याचा खडकी येथे झालेल्या युद्धात पराभव करून इंग्रजांनी दक्खन प्रांतावर वर्चस्व स्थापन केले. या दरम्यान इंग्रजांनी प्रस्थापित केलेल्या राज्यात फक्त प्रशासकीय बदल अपेक्षित नव्हते तर सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात घुसळण होऊन अनेक दूरगामी आणि मुलभूत बदलांचा पाया रचला जात होता. 1835 मध्ये मेकॉलेच्या प्रसिद्ध मिनीट्स ऑन इंडियन एज्युकेशन या भारतीयांच्या शिक्षणावरील मूलभूत धोरणात्मक टिप्पणी नंतर विशेषतः बंगाल आणि मुंबई प्रांतात सामाजिक बदलांचे वारे वेगाने वाहू लागले. जात-व्यवस्था नाकारणे, विधवा पुनर्विवाह, बालविवाह बंदी आणि सर्वांसाठी शिक्षण (स्त्रिया आणि वंचित) या चतुःसूत्री वर सामाजिक पुनरुज्जीवन आधारलेले होते. एका बाजूला सामाजिक अभिसरणाची चळवळ आणि दुसरीकडे 1857 च्या फसलेल्या उठावामुळे हळूहळू जागृत होणारी राष्ट्रवादाची जाणीव, अशा या कालखंडात केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक लहानाचे मोठे झाले.
विद्यार्थी जीवनातच टिळकांनी संस्कृत आणि गणितासोबतच भारतीय आणि पाश्चात्य तत्वज्ञानाचा अभ्यास केला होता. आपल्या प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी राजकारण आणि समाजकारणच नव्हे तर पत्रकारिता, वकिली, शिक्षणशास्र आणि खगोलशास्त्रात अधिकारवाणीने भाष्य करून मुलभूत योगदान दिले आहे. त्यांच्या स्मृतीशताब्दी निमीत्त लोकमान्य टिळकांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या काही पैलूंचे, तटस्थ आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण होणे गरजेचे आहे. तसेच शंभर वर्षानंतर देखील टिळकांच्या विचारांची प्रासंगिकता तपासून पाहणे आवश्यक आहे.

लोकमान्य टिळकांचे राजकारण: भारतीय असंतोषाचे जनक असलेल्या लोकमान्य टिळकांनी आपल्या राजकारणाची सुरुवात 1990 साली काँग्रेस पक्षातून केली. 1885 साली स्थापन झालेल्या आणि नेमस्तांचा पक्ष अशी ओळख असलेल्या काँग्रेस पक्षाचा परीघ शहरी आणि विशेष करून तत्कालीन बॉम्बेपुरता मर्यादित होता. टिळकांनी काँग्रेस पक्षाचा नुसता विस्तारच केला नाही तर बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीनुसार पक्षांतर्गत जहाल गट निर्माण करून नवीन ओळख दिली. समाजातील बहुजन आणि वंचितांना त्यांनी पक्षाच्या कवेखाली आणले. टिळकांनीच अल्पसंख्यांक समाजाच्या मागण्या प्रथमतः समोर मांडून लखनौ इथे काँग्रेस आणि मुस्लिम लीग मध्ये सहकार्याचा करार केला आणि इंग्रजांच्या विरोधात सर्वाना एकत्र आणले . भारतीय समाजातील सर्व विचार प्रवाहांना एकत्र आणण्याची टिळकांची हातोटी विलक्षण होती. वेगवेगळी विचारसरणी असलेले अनेक क्रांतिकारी गट आणि समांतर कार्य करणार्‍या संघटनांना (उदा: होमरूल लीग) टिळकांनी काँग्रेस पक्षाच्या छत्रीखाली एकत्र आणले होते. गांधीजींच्या पूर्वी काँग्रेस अंतर्गत लोकशाही आणि पक्षाचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोचवण्याचे कार्य टिळकांनी व्यापक स्वरुपात केले होते. आपल्या भाषणातून आणि लेखणीतून त्यांनी स्वराज आणि आर्थिक राष्ट्रवाद या संकल्पनांचा पाया रचताना संघटन कसे मजबूत करता येईल यावर त्यांनी विशेष लक्ष दिले होते.

टिळकांच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाची सुरुवात होम रूल लीग पासून झाली असली तरीदेखील त्यापूर्वी पासूनच आंतरराष्ट्रीय घडामोडींबाबत ते नेहमीच जागरूक असत. बंगालच्या फाळणी नंतर 1907 मध्ये रशीयाच्या कॉम्रेड लेनिन बरोबर त्यांचा पत्रव्यवहार झाला, कामगार चळवळी आकर्षण असणारे टिळक, पुण्यात ’तेल्या तांबोळ्यांचे पुढारी ’ म्हणूनच ओळखले जायचे. टिळकांना शिक्षा झाल्याचा निषेध लेनिन यांनीही केला होता . त्यानंतर रशियातील 1917 साली झालेल्या कामगार क्रांतीमुळे टिळक एवढे प्रभावित झाले की, त्या क्रांतीने भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याच्या आशा पल्लवित झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. इंग्लंड मधील अनेक नेत्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. परकीय भूमीवर आपले मित्र असले पाहिजेत म्हणून नोव्हेंबर 1918 मध्ये टिळकांनी मजूर पक्षाला भारतीय जनतेकडून भेट म्हणून 2000 पौंड एवढी रक्कम इलेक्शन फंड स्वरुपात देवून त्या मोबदल्यात मजूर पक्षाकडून भारतीय स्वातंत्र्यास पाठींबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या महायुद्ध्याच्या काळात टिळकांनी ब्रिटीश जर प्रतिसादात्मक सहकार्य करण्यास तयार असतील तर आम्ही त्यांना मदत करू, असा लेख केसरी मध्ये लिहिला होता.

लोकमान्य टिळकांची पत्रकारिता: राजकारणात येण्यापूर्वीच जवळपास दशकभर आधी टिळकांनी पत्रकारितेला सुरुवात केली होती. 1881 साली त्यांना आगरकर यांचे सोबत मराठा आणि केसरी ही वर्तमानपत्रे सुरू केली. त्यातील अग्रलेखाद्वारे मराठी पत्रकारितेवर आपली कायमची छाप निर्माण केली. अत्यंत टोकदार आणि निर्भीड भाषेचा वापर त्यांनी लोकशिक्षण, माहिती आणि मनोरंजनासोबत अन्यायाला वाचा फोडणे, लोकांची गार्‍हाणी मांडणे आणि इंग्रजी सत्तेविरुद्ध लोकमत तयार करणे यासाठी केला. 1899 मध्ये टिळक राजद्रोहाची शिक्षा भोगून परत आले. लगेच 4 जुलै 1899 लिहीलेल्या केसरीच्या ‘पुनःश्च हरी ॐ’ या अग्रलेखातून त्यांच्या ब्रिटीशांच्या विरोधातील ध्येयधोरोणांत तिळमात्रही बदल होणार नाही हे स्पष्ट केले. पत्रकारांचे कर्तव्य काय असावे या संदर्भात त्यांनी 27 सप्टेंबर 1904 रोजी केसरीच्या अंकात प्रकाशित केलेले विचार आज देखील तंतोतंत लागू पडतात. ते म्हणतात, सरकारवर कडक टीका केल्याने त्यांचा रोष आमच्यावर झाला तर त्याची आम्हास पर्वा नाही. सरकारच्या जुलमी राज्यपद्धतीवर कडक टीका करावयाची नाही तर वर्तमानपत्र काढावे तरी कशाला? …सारांश आमची मते व भाषा कितीही कडक असो तो मनाचा धर्म आहे. टिळकांच्या अग्रलेखाइतकीच त्यांची शीर्षके मर्मभेदी असत. राष्ट्र जाणीव निर्माण होण्याकरिता टिळकांनी पत्रकारितेचा उपयोग केला. दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकर्‍यांच्या व्यथा, दारीद्र आणि इंग्रज सरकारची आर्थिक पिळवणुक यावर त्यांनी सातत्याने भाष्य केले. 6 डिसेंबर 1892 रोजी केसरीच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या शेतकरी लोकास खरोखरच बंड करावे लागेल काय? यामध्ये त्यांनी शेतकर्‍यांच्या शोषणाविरुद्ध इंग्रजांना इशारा दिला होता. इंग्रजांच्या आर्थिक धोरणांचे कठोर टीकाकार दादाभाई नौरोजी, आर. सी. दत्त यांचे विश्लेषण केसरीमध्ये आग्रह-पूर्वक छापले जात असे. ब्रिटीश सरकार विरोधी लोकक्षोभ आणि अर्थकेंद्री राष्ट्रवाद निर्माण करण्याचे प्रयत्न त्यांनी सतत सुरु ठेवले होते. याशिवाय उदारमतवादी आणि भारताबद्दल सहानुभूती व्यक्त करणार्‍या ब्रिटीश नेत्यांचे विचार, त्याचे लेख आणि पुस्तके यांना आवर्जून वर्तमानपत्रात स्थान मिळत असे. टिळक आणि समाजसुधारणा: सामाजिक सुधारणेबाबत लोकमान्य टिळकांचे विचार मात्र प्रतिगामी होते. वेदोक्त प्रकरणात त्यांनी घेतलेली भूमिका असो किंवा पंचहौद मिशन घटनेत टिळकांनी घेतलेले प्रायश्चित अथवा टिळक-आगरकर वाद अशा अनेक ठिकाणी त्यांच्यावरील सनातनी आणि धार्मिक विचारांचा पगडा दिसून येतो. सामाजिक पुनर्घटनेचे कार्य राजकीय राजकीय विमोचन होण्यापूर्वी व्हावे असे माझे मत नाही, राजकीय विमोचनाला मी जास्त महत्व देतो असे त्यांनी डिसेंबर 1919 मध्ये मुंबई येथील एका संपादकांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट नमूद केले होते. समाजातील स्त्री विषयक सुधारणा आणि स्त्री शिक्षण याबाबतीत टिळकांनी केसरीमधून अनेकदा विरोध केला होता. टिळकांची राजकीय विचारसरणी जेवढी आक्रमक, परिवर्तनवादी आणि जहाल होती त्या तुलनेत त्यांची सामाजिक सुधारणांबाबतीत मते बर्‍याच अंशी प्रतिगामी आणि पारंपारिक होती. अर्थात एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या सुरवातीला जनसमूहाचे नेतृत्व करणार्‍या व्यक्तीच्या कर्तृत्वात तत्कालीन समाजव्यवस्थेचे प्रतिबिंब असणे, समतेच्या दृष्टीने विचार जरी अप्रिय वाटले तरी ते स्वाभाविक आहे.

कलकत्ता येथील ऐतिहासिक काँग्रेस अधिवेशनासाठी अध्यक्ष म्हणून टिळकांचे नाव निच्छित झाले होते, पण 1 आंगस्टला शंभर वर्षापूर्वी मुंबईच्या सरदार गृहात लोकमान्यांनी देह ठेवला. त्यांच्या कृतीचे आणि भूमिकेचे विश्लेषण करत असताना समकालीन परिप्रेक्ष्यात पाहणे गरजेचे ठरते. कालानुरूप समाजकारण, राजकारण यांचे संदर्भ बदलतात. तत्कालीन प्रश्न आणि समस्या सुटलेल्या असतात किंवा त्यांचे स्वरूप बदललेलं असते. टिळकांनी लोकसहभागी आणि सर्वसमावेशक राजकारणावर अधिक भर दिला. गोखले, रानडे यांनी सुरु केलेल्या काँग्रेस पक्षाच्या सामाजिक आणि भौगोलिक कक्षा रुंदावल्या. राष्ट्रवादाची संकल्पना सामान्य जनतेपर्यंत पोचवण्यासाठी पत्रकारितेचा प्रभावी वापर केला आणि त्यामधून भारतीय जनतेला स्वराज्य या आपल्या जन्मसिद्ध हक्काची वारंवार जाणीव करून दिली. त्यांच्या धर्मवादी विचारांशी व त्यांनी सामाजिक सुधारणांबाबत घेतलेल्या प्रतिगामी भूमिकेशी आज सहमत होणे शक्य नाही. परंतु, भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांच्या अतुलनीय योगदानामुळे कवी कुसुमाग्रज यांच्या टिळकांच्या पुतळ्याजवळ या कवितेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही…

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा