राष्ट्रीय शिक्षणाचा विचार करताना टिळकांना आधुनिक व प्राचीन विचारांचा शिक्षणाचा संगम अपेक्षित होता. जे जे राष्ट्रीय हिताचे तेथे स्वार्थ बाजूला ठेवून प्रजेने स्वीकारावे. भक्तियुक्त ज्ञानपूर्वक लोकसंग्रहात निष्काम कर्मयोग सर्व हिंदुस्थानातील लोकांनी स्वीकारावा ही त्यांची इच्छा होती.

आधुनिक भारताचे शिल्पकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिशताब्दी निमित्ताने लोकमान्य टिळकांच्या बीज विचारांचा मागोवा घेणे आज आवश्यक आहे. आधुनिक भारताच्या पायाभूत कालखंडात टिळक विचारांचे मोठे योगदान दिसून येते. याच कालखंडात युरोपमध्ये यांत्रिकीकरणामुळे पहिली औद्योगिक क्रांती झाली. मोठ्या प्रमाणावर तयार होणार्‍या पक्क्या मालाला कायमस्वरूपी बाजारपेठ हवी होती. इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीकडून विविध राज्यांचा समूह ताब्यात घेऊन भारत तयार केला. तेथील स्थानिक उद्योगधंदे, हस्तकला बंद पाडून आर्थिक लूट केली. कायमस्वरूपी हक्काची बाजारपेठ असावी म्हणून इंग्रजी शिक्षणाबरोबर पाश्चिमात्य संस्कृतीचा शिरकाव केला. दारिद्र्य, रोगराई, दुष्काळ आणि बेरोजगारी यामुळे हिंदुस्थानची प्रजा त्रस्त झाली होती. याच कालखंडात लोकमान्य टिळकांनी स्वतंत्र आधुनिक भारताच्या लढ्याची आखणी केली. हिंदुस्थानचा स्वातंत्र्य लढा हा आर्थिक स्वातंत्र्याचा होता. विविध राज्य, धर्म, जाती, भाषा यात विभागलेल्या भारतीय जनतेमध्ये एकात्मतेची भावना निर्माण करणे आवश्यक होते. मृतवत झालेल्या भारतीय जनतेच्या मनामध्ये स्वाभिमान जागृत करण्याची जबाबदारी होती. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव, शिवजयंती उत्सव, फेमिन कोड, पिकेटिंगसारख्या चळवळींमधून सर्वसामान्य जनतेस एकत्र आणले. इंग्रजी कायद्याच्या चौकटीत राहून जनतेला त्यांच्या प्रश्नांची जाणीव करून दिली. केसरी, मराठा ही वृत्तपत्रे, तसेच व्याख्याने, कीर्तन, मेळे सारखी अशी अनेक माध्यमे वापरून विविध प्रश्नांची व त्यावरील उपायांची माहिती करून दिली. शहाणे करून सोडावे सकल जन याप्रमाणे टिळकांनी भारतातील दारिद्र्यास इंग्रजी सत्ता कशी कारणीभूत आहे हे रयतेस पटवून दिले. लोकमान्य टिळकांचे वेगळेपण हे आहे की, लोक, लोकमत ही संकल्पना टिळकांनी भारतीय राजकारणात प्रथम आणली. राष्ट्रीय काँग्रेस किंवा केवळ सुशिक्षितांमध्ये चर्चा घडवून स्वातंत्र्य मिळणार नाही हे लोकमान्यांनी अचूक ओळखले होते. म्हणूनच टिळकांनी लोकजागृतीची सुरुवात केली. टिळकांचा प्रजातंत्राचा विचारदेखील नवा होता. आपले दारिद्र्य दूर करावयाचे असेल, प्रगती साधावयाची असेल, तर आपण सर्वांनी एक होऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. तूच तुला मदत करू शकतोस हा गीतेतला विचार टिळकांनी सार्‍या भारतीय जनतेत रुजवला. विभागलेला समाज ?एकत्र आणला. सहिष्णुता, राष्ट्रप्रेम, राष्ट्रीयत्व, समान हित या मुद्द्यांवर नवा भारत उभारण्याची आशा टिळकांनी जनतेत जागृत केली. राष्ट्राच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेली स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही चतु:सूत्री टिळकांनी सांगितली. स्वराज्यात सर्वांना विकासाची समान संधी मिळावी. येथे लोकशाही व सहिष्णू राज्यव्यव्यस्था असावी, असे प्रतिपादन टिळकांनी केले. ‘स्वातंत्र्य हा राष्ट्राचा आत्मा आहे. स्वातंत्र्य कधी म्हातारे होत नाही; कारण आत्मा हा अमर आहे. आमची चळवळ जर कधी कमी पडू लागली तर त्यातील आत्म्याचे स्वातंत्र्य हे नित्य, अविनाशी आहे.

लोकमान्यांची चतु:सूत्री

पहिल्या महायुद्धाचे ढग पाहिल्यावर टिळकांनी भारतीयांना सैन्य भरतीचा आदेश दिला आणि लगेच युक्तिवाददेखील केला. आज हिंदुस्थानला स्वराज्यप्राप्तीची वेळ आलेली आहे निश्चित. स्वराज्याचे हे जांभूळ अचानकपणे तुमच्या तोंडात पडेल, असे समजू नका. हक्कासाठी रुसून बसले पाहिजे. आज तुमच्या रुसून बसण्याला विचारते कोण? लष्करी शिक्षण मिळालेले एक लाख लोक राष्ट्रात रुसलेले आहेत. असे पाहिल्यावर कोणता सेनापती तुम्हाला असंतुष्ट ठेवण्यास धजणार आहे? टिळकांचे राजकीय धोरण सांगावयाचे, तर प्रतियोगी सहकारितेचा पर्याय टिळकांनी इंग्रजांपुढे ठेवला. टिळकांनी महायुद्धाचा फायदा उचलत म्हटले, ‘आजपर्यंत तुम्ही मालक आम्ही नोकर या नात्याने आपण राहिलो. आम्हास आता बरोबरचा मित्र म्हणून दर्जा द्या. आम्हाला राष्ट्रसंघात प्रतिनिधित्व पाहिजे.’ होमरूल लीग किंवा स्वराज्य संघाच्या वाढत्या पाठिंब्यानंतर महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळकांना ‘स्वराज्य’ जवळ आल्याचे जाणवले. त्यासोबतच्या सहकार्‍यांबरोबर स्वतंत्र भारताचा विचार करण्यास सुरुवात केली. लोकमान्य टिळकांनी जो स्वराज्याचा सूक्ष्म विचार केला होता, तसाच चतु:सूत्रीतील स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षणाबाबत केला होता. बहिष्कार हे कृतिशील अहिंसक अस्त्र लोकांच्या हाती दिले. ज्या अस्त्रामुळे इंग्रजी राजवटीचे अर्थकारण बदलले. कच्चा माल हिंदुस्थानातून नेऊन पक्का माल विकून मधला मोठा मलिदा लाटण्याची इंग्रजांची नीती बहिष्काराने हाणून पाडली. स्वदेशीमध्ये स्वदेशी उद्योग, स्वदेशी अर्थकारण, बँका, व्यापार, तंत्रज्ञान या सर्वांचा विचार टिळकांनी केला होता. शेती, शेतीप्रक्रिया उद्योग, दुष्काळ, रोजगारी. भारत हा शेतीप्रधान देश आहे. या सर्व गोष्टींबरोबर टिळकांच्या दूरदृष्टीला स्वतंत्र भारताचे अर्थकारण दिसत होते. राष्ट्रीय शिक्षणाचा विचार करताना टिळकांना आधुनिक व प्राचीन विचारांचा शिक्षणाचा संगम अपेक्षित होता. जे जे राष्ट्रीय हिताचे तेथे स्वार्थ बाजूला ठेवून प्रजेने स्वीकारावे. भक्तियुक्त ज्ञानपूर्वक लोकसंग्रहात निष्काम कर्मयोग सर्व हिंदुस्थानातील लोकांनी स्वीकारावा ही त्यांची इच्छा होती. लोकमान्य टिळकांचे विचार हे कालातीत तर आहेतच; पण नव्या आधुनिक भारताच्या उभारणीत पायाभूत आहेत. टिळकांनी 1918 मध्ये काँग्रेस पक्षासाठी एक धोरणात्मक जाहीरनामा प्रसिद्ध केला. तो पाहिला तर लोकमान्य टिळकांच्या मनातील स्वतंत्र भारताचा नकाशा दिसतो. वरिष्ठ कारभाराच्या सुधारणांमध्ये टिळकांनी वृत्तपत्र स्वातंत्र्य, रौलेट अ‍ॅक्ट, आर्म अ‍ॅक्ट वगैरे कायदे रद्द करावेत, शेतमजूर आणि कामगारांचे किमान वेतन दर ठरवावेत, कारखानदार व मजुरांतील तंटे सोडवण्याची संस्थात्मक व्यवस्था करणे, सणवाराच्या पगारी सुट्ट्या देणे, जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करण्यासाठी निर्यातीवर कर बसवणे, स्वदेशी उद्योगास उत्तेजन देण्यासाठी आर्थिक मदत करणे, तसेच मालगाडीचे योग्य दर ठरवून प्रत्येक उद्योगाला पोषक होईल, अशी करप्रणाली ठरविणे, हिंदुस्थानी लोकांना लष्कर, आरमार, आकाशयान विद्या यांचे शिक्षण देणे. सनदी अधिकारी पदभरती करिता उघड चढाओढीच्या परीक्षा घेणे, सर्व प्रांतात राष्ट्रीय ऐक्य राखण्यासाठी एका देशी भाषेची निवड करणे, भाषावार प्रांतरचना करणे, तर प्रांतिक जाहीरनाम्यात टिळकांनी प्रांतिक स्वराज्याच्या मागणीबरोबर न्याय शेतसारा ठरविणे, गुरचराई, सरपण इत्यादींचे राखीव वनाचे अधिकार ग्रामपंचायतीकडे देणे, वेठबिगारी, सरकराई रद्द करणे, शक्यतो वरच्या पायरीपर्यंत देशी भाषांतून शिक्षण देणे, मुले आणि मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे, ग्रामपंचायतीचे पुनर्जीवन करून त्यांना अधिकार देणे, मद्यपानास पूर्ण बंदी करणे, स्त्री-पुरुष भेद न ठेवता मतदारसंघाची स्थापना करणे, स्वतंत्र आरोग्य मंत्री नेमून देशातील आरोग्याची सुधारणा करणे, शेतकी सुधारणा, सहकार चळवळ, देशाच्या परिस्थितीचा विचार करून औद्योगिक यांत्रिक शिक्षण, औषधोपचाराची सोय व देशी वैद्यकास उत्तेजन इत्यादी मागण्या केल्या.

राष्ट्रनिर्मितीचा बीजविचार

लोकमान्य टिळकांचे आधुनिक भारताचे पायाभूत विचार आज एकशेतीस वर्षानंतर देखील एखाद्या दीपस्तंभासारखे आहेत. स्वातंत्र्यानंतर कितीतरी वर्षांनंतर आपण शिक्षणाचा व अन्नाचा जन्मसिद्ध अधिकार दिला. ग्रामपंचायतीना आर्थिक अधिकार दिले आहेत. कौशल्य विकासाचा आज आपण उच्चार करत आहोत. ग्लोबलायझेशन किंवा विश्व स्वातंत्र्यात आपण आपले लघु उद्योग वाचवू शकलो नाही. यांत्रिकीकरण, रोबोटिक आणि आर्टिफिशिअल इन्टलीजन्समुळे वाढत्या बेरोजगारीचा प्रश्न आपल्या देशाला भेडसावत आहे. आज पुन्हा आत्मनिर्भर भारताची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. लोकमान्य टिळकांच्या स्वदेशी आणि बहिष्कार या विचारांच्या आधारावरच भारत स्वावलंबी बनू शकतो. माध्यमांचे स्वातंत्र्य हे भांडवलशाही व्यवस्थेत धोक्यात आहे. नागरिकांना भांडवली व्यवस्थेला वाटेल, असा माहितीचा स्रोत उपलब्ध आहे. वृत्तपत्र स्वातंत्र्य आजही फौजदारी कायद्यात आहे. राज्य आणि केंद्र यांचे अधिकार राज्यपाल आणि मुख्यमंत्री, आयाराम गयाराम, आरक्षण हे मुद्दे ऐरणीवर आहेत. देश एकात्मतेपेक्षा विभाजनाकडे चालला आहे. अशा काळात स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि प्रगती या मूलभूत तत्त्वावर पुन्हा एकदा देशाची पुनर्बांधणी होणे आवश्यक झाले आहे. लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रनिर्मितीच्या बीज विचारांचा यावेळी विचार करावा लागेल. लोकमान्य टिळकांचे कर्मयोगी चरित्र, तसेच टिळकांच्या गीतारहस्यातील आत्मसंयमाचे, देशकार्याचे अनुकरण करणे आवश्यक आहे. श्रीमद् भगवदगीतेत सांगितलेली माया ओळखणे, आत्मसंयम राखणे, समाज धारणेकरिता सांगितलेला (धर्म) नीती नियम पाळणे, राष्ट्रात राष्ट्रीयत्वाबरोबर सहिष्णुतेचे वातावरण निर्माण करणे, सर्वांना प्रगतीचे स्वांतत्र्य व समान संधी देणे, देशाची समृद्धी वाढवणे, प्रत्येकाने राष्ट्रदेव झाल्यानेच लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दीच्या दिवशी त्यांना आदरांजली ठरेल. लोकमान्य टिळकांच्या संजीवक स्मृतीस केसरीतर्फे विन्रम अभिवादन.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा