चोवीस तासांत ५५ हजार ७८ नवे रुग्ण;७७९मृत्यू

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत चालला आहे. मागच्या चोवीस तासांत कोरोनाचे तब्बल 55,078 नवे रुग्ण आढळले आहेत, तर 779 जणांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे कोरोना रुग्ण संख्या 16 लाख 38 हजार 870 वर पोहोचली आहे. तर, बळींची संख्या 35 हजार 747 वर गेली आहे.

गेल्या सहा-सात दिवसांपासून 50 हजारच्या आसपास रुग्ण समोर येत होते. मात्र, मागच्या दोन दिवसांपासून 50 हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. जुलै महिन्यात कोरोनाचे तब्बल 10 लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले. सुरुवातीचा एक लाखाचा टप्पा ओलांडायला 110 दिवस लागले होते. तर, 16 लाखांचा टप्पा ओलांडायला 183 दिवस लागले. देशात सध्या 5 लाख 45 हजार 318 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, 10 लाख 57 हजार 805 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागच्या 24 तासांत 37 हजार 223 रुग्ण बरे होऊन घरी परतले. गुरुवारी तब्बल 6 लाख 42 हजार 588 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. तर, आतापर्यंत 1 कोटी 88 लाख 32 हजार 970 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी 8.57 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 64.54 इतके आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना चाचणीत वाढ करण्यात आली आहे. जुलैमध्ये एक कोटींहून अधिक जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली.

बळींच्या संख्येत भारत पाचवा

कोरोना रुग्णसंख्येत भारत तिसर्‍या क्रमांकावर तर बळींमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत कोरोनामुळे 1 लाख 55 हजार 67 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राझिलमध्ये 91 हजार 377, इंग्लंड 45 हजार 999, मेक्सिको 45 हजार 361 तर भारतात 35 हजार 747 जणांना प्राण गमवावे लागले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा