विद्याविलास पाठक, ज्येष्ठ पत्रकार

टिळकांपुरते बोलायचे झाले तर त्याकाळी देशव्यापी ओळख असलेले ते एकमेव नेते होते. महाराष्ट्रात त्यांच्याविषयी अनेक साहित्यिकांनी, कवींनी लिहिले असले तरी हिन्दी आणि उर्दू भाषक पट्ट्यातही टिळक तेवढेच लोकप्रिय होते. त्यांच्यावर अनेक हिन्दी आणि उर्दू साहित्यिकांनी काव्य केले आहे.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीय जनतेच्या मनात स्वातंत्र्याची उर्मी निर्माण केली. ब्रिटिशांच्या राजवटीत जनता जणू अचेतन झाली होती. जनतेतील अस्मिता आणि स्वातंत्र्याची उर्मी नष्ट झाली होती ती पुन्हा चेतावण्याचे काम टिळकांनी केले. 1857 च्या स्वातंत्र्य समरानंतर-विसाव्या शतकाच्या सुरूवातीस भारतीय जनतेत देशभक्तीची जी जोरदार लाट उसळली तिचे जनकत्व सर्वार्थाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याकडेच जाते. लोकमान्यांनी समाज संघटित करून त्याचे प्रबोधन करण्याचे काम केले. त्यासाठी केसरी – मराठा यासारखी नियतकालिके सुरू केली, जनतेत राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी न्यू इंग्लिश स्कूल, फर्ग्सन कॉलेज यांची स्थापना केली. समाज संघटित व्हावा या हेतूने गणेशोत्सव आणि शिवजयंती यासारखे उत्सव सुरू केले. गणेशोत्सवात मेळ्यातून गायल्या जाणार्‍या कवनातून जनजागृती करण्याचे काम केले. याच वेळी केसरी आणि मराठा या नियतकालिकातून ब्रिटिश सरकारवर टीकेची झोड उठवली. लोकमान्यांच्या या कामगिरीचा प्रभाव केवळ महाराष्ट्रापुरताच न राहता संपूर्ण देशावर झाला. प्रांता-प्रांतात त्यांचे अनुयायी निर्माण झाले. त्यात समाजसुधारक होते, क्रांतिकारक होते तसेच साहित्यिकही होते. मराठीतल्या अनेक कवींनी टिळकांच्या या कामात आपआपल्या परीने हातभार लावला. हिन्दी, उर्दू, बंगाली, इंग्रजी साहित्यिकही या कार्यात अग्रेसर होते. उत्तर प्रदेशात टिळकांना अनेक अनुयायी लाभले. त्यात कवि होते,शायर होते, क्रांतिकारी होते. त्यातल्या प्रत्येकाने स्वातंत्र्य लढ्यात आपापला वाटा उचलला. हिन्दी आणि उर्दू साहित्यिकांवर त्यांचा विलक्षण प्रभाव होता. त्यातूनच हाली, अकबर, इक्बाल, हसरत मोहानी, पंडित व्रजनारायण चकबस्त यांच्या सारखे राष्ट्रभक्त कवि-शायर उदयास आले. स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी लाल-बाल-पाल म्हणजेच लाला लाजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल- यांच्यावर लोकांचे निरतिशय प्रेम होते. टिळकांपुरते बोलायचे झाले तर त्याकाळी देशव्यापी ओळख असलेले ते एकमेव नेते होते. महाराष्ट्रात त्यांच्याविषयी अनेक साहित्यिकांनी, कवींनी लिहिले असले तरी हिन्दी आणि उर्दू भाषक पट्ट्यातही टिळक तेवढेच लोकप्रिय होते. त्यांच्यावर अनेक हिन्दी आणि उर्दू साहित्यिकांनी काव्य केले आहे. त्यात प्रामुख्याने उल्लेख करता येईल असे हसरत मोहानी आणि पंडित व्रजनारायण चकबस्त, डॉ. पांडेय यांचा उल्लेख करावा लागेल.

हसरत मोहानी जहालांचे तर चकबस्त हे मवाळांचे समर्थक होते. चकबस्त यांचा जहालांना प्रचंड विरोध होता.राजकारणात जहालांचे वर्चस्व वाढते आहे असे दिसताच त्यांनी राजकारणाचाच त्याग केला.चकबस्त मवाळ असले तरी जहालांचे नेते असलेल्या लोकमान्यांविषयी त्यांना प्रचंड आदर आणि प्रेम होते आणि त्यांनी ते आपल्या काव्यांतून वेळोवेळी व्यक्त केले आहे.

उर्दू कविता प्रणयाच्या ठराविक चाकोरीत बंदिस्त असताना तिला समाज आणि राष्ट्राच्या सेवेसाठी राबवण्याचा उपक्रम पंडित ब्रजनारायण चकबस्त यांच्या आधी ‘हाली’ व ‘अकबर’ यांनी सुरू केला होता. त्यांचे समकालीन कवि ‘इक्बाल’ यांनीही उर्दू साहित्यात राष्ट्रीय कवितेचे नवे दालन उघडले होते; परंतु हे सर्व कवि उर्दूच्या जुन्या चाकोरीशी जुळते घेणारे होते. त्यांच्या सामाजिक आणि राष्ट्रीय कवितांवर मुस्लिमत्वाची छाप स्पष्टपणे पडलेली दिसे. चकबस्त मात्र सर्वार्थाने समाजसुधारक व राष्ट्रीय कवि होते. त्यांनी प्रणयाची अथवा शृंगाराची एकही ओळ लिहिली नाही. ते काश्मिरी ब्राह्मण असल्याने काश्मिरी लोकांच्या सामाजिक कार्यात ते हिरिरीने सहभागी होत असत मात्र तेथेही ते काश्मिरी लोकांना सुधारणेची व राष्ट्रीयत्वचीच दीक्षा देत असत.

चकबस्त यांचा जन्म 1882 चा. उत्तर प्रदेशातल्या फैजाबादचा. तेथून ते लखनौला आले आणि तेथेच स्थायिक झाले. 1905 मध्ये बी.ए. झाल्यावर त्यांनी कायद्याची परीक्षा दिली आणि लखनौतच वकिलीही सुरू केली.

प्रथा-परंपरेच्या विरुद्ध जाण्याचा त्यांचा स्वभाव असल्याने त्याकाळातली कोणाला तरी गुरु करून घेण्याची किंवा टोपणनावाने कविता किंवा शायरी करण्याची प्रथा त्यांनी मोडीत काढली. त्यांनी कोणालाच गुरु केले नाही तसेच टोपणनावही (तखल्लूस) घेतले नाही. चकबस्त हे त्यांच्या घराण्याचे नाव होते. गझलाच्या किंवा कवितेच्या शेवटच्या दोन चरणात (मक्त्यात) कवि आपल्या टोपणनावाचा उल्लेख करत असतो मात्र चकबस्त यांच्या काव्यात चुकूनही तसा उल्लेख कुठे आढळत नाही.

चकबस्त यांनी वयाच्या नवव्या वर्षी पहिली गझल लिहिली; परंतु नंतर त्यांनी गझल ऐवजी ‘नज्म’ म्हणजे कविता लिहिण्यावरच विशेष भर दिला. त्यांच्या कवितांचा संग्रह सुबह-ए -वतन (मातृभूमीची प्रभात) प्रसिद्ध झाला तोही त्यांच्या मृत्यूनंतर. मर्सिया म्हणजे शोककाव्य लिहिण्यात चकबस्त यांचा हात धरू शकणारा कवि उर्दूत आजवर झालेला नाही. चकबस्त यांनी लिहिलेल्या शोककाव्यात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, पंडित बिश्ननारायण दर यांच्यावरील शोककाव्यांचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. लोकमान्य टिळकांसंबंधीच्या शोकगीतात ते म्हणतात-

‘मौतने रातके परदेमे किया कैसा वार
रोशनी सुबहे वतन की, है कि मातमका गुबार…

लोकमान्यांचे निधन मध्यरात्री झाले त्याचा संदर्भ देत चकबस्त म्हणतात ‘मृत्यूने रात्रीच्या पडद्याआड कसा भयंकर वार केला! हा मातृभूमीच्या पहाटेचा प्रकाश आहे की शोकाचा धुरळा आहे? रणभूमी शांत आहे आणि देशाचा सरदार झोपी गेला आहे. सिंहाची गर्जना आता उरलेली नाही, सार्‍या अरण्यात शुकशुकाट आहे. सर्वत्रच असहायता दिसते आहे. नशीबच जणू फिरले आहे. राष्ट्राच्या हातातील तलवार गळून पडली आहे.’
लोकमान्यांचे निधन हा केवळ त्यांच्या कुटुंबाला बसलेला धक्का नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकणारी ती घटना आहे अशी चकबस्त यांची धारणा होती त्यामुळेच ते म्हणतात…

‘मौत महाराष्ट्रकी थी या तेरे मरनेकी खबर
मुर्दनी छा गयी इन्सान तो क्या, पत्थरपर…

‘ही तुझ्या मृत्यूची बातमी होती की महाराष्ट्राच्या मृत्यूची बातमी होती? माणसांवर नव्हे, तर दगडांवरही शोककळा पसरली आहे. पाने झुकली, जंगलातील झाडे कोमेजली, खळाळून वाहणार्‍या नद्या थबकल्या, डोंगराळ प्रदेशावरुन वहात येणारे थंड व प्रफुल्लित करणारे वारे थांबले, इतकेच काय पण दोन-चार क्षण तार्‍यांचा प्रकाशही कमी झाला.’

चकबस्त हे राजकारणात नेमस्तांच्या बाजूचे होते. त्यामुळे गांधीजींच्या असहकार आंदोलनापर्यंत ते काँग्रेसमध्येच होते मात्र नंतर काँग्रेसमध्ये जहालमतवाद्यांचा जोर वाढताच ते राजकारणातून निवृत्त झाले. चकबस्त यांची स्वातंत्र्य लढ्याला दिलेली महत्त्वाची देणगी म्हणजे ‘इन्किलाब जिंदाबाद’ही घोषणा. स्वातंत्र्यलढ्यात जोश आणि ऊर्जा निर्माण करण्याचे काम या ‘इन्किलाब जिंदाबाद’ने केले आहे.लोकमान्यांवर चकबस्त यांच्याएवढेच प्रेम करणारे दुसरे शायर आहेत ‘हसरत मोहानी‘. हे टिळकांचे निस्सीम भक्त! अब्दुल शकूर यांनी मोहानी यांचे चरित्र लिहिले आहे त्यात ते म्हणतात ‘हसरतच्या राजकारणाचा सर्वात मोठा आधार म्हणजे टिळक होत. हसरतने आपल्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात कितीतरी राजकीय नेते पाहिले; पण त्याला आदर वाटे तो केवळ टिळकांविषयी. टिळकांचे नाव तो नेहमी आदराने घेई. तो नेहमी म्हणे की, टिळकांएवढा सडेतोड आणि खंबीर मनुष्य माझ्या पाहण्यात आला नाही.’

टिळकांनी स्वातंत्र्यासाठी केलेले प्रयत्न, त्यांना झालेली कारावासाची शिक्षा आणि त्यांचे निधन याविषयी हसरत मोहानी यांनी काव्यातून व्यक्त केलेल्या भावना पाहिल्या तर त्यांचे लोकमान्यांवर किती प्रेम होते याची प्रचिती येते. लोकमान्यांच्या मृत्यूची बातमी ऐकताच ‘आजादीके सरताज तिलक’ या शब्दात ते व्यक्त झाले –
‘मातम न क्यो हो भारतमे वपा, दुनियासे सिधारे आज तिलक
बलवंत तिलक, महाराज तिलक, आजादीके सरताज तिलक’

न्यायमूर्ती दावर यांनी टिळकांना शिक्षा ठोठावली तेव्हा त्यांनी दावर यांची आपल्या शायरीतून त्यांनी अशी निर्भत्सना केली. ते लिहितात…

‘ताअत है फिरंगियोंकी जिनका दस्तूर
क्या खाक उन्हे दाद गरी का हो शऊर
इन्साफके दुश्मनो ! दावर है लकब ‘

‘फिरंग्यांची सेवा करणे हाच ज्यांचा धर्म, त्यांना न्याय बुद्धी कुठून असणार? न्यायाच्या शत्रूंनो, तुम्हाला ‘दावर’ म्हणणे म्हणजे एखाद्या काळ्याकुट्ट माणसाला
कर्पूरर्गौर म्हणण्यासारखे आहे.’ (फार्सीत ‘दावर’ म्हणजे न्यायी.)

टिळकांनी इंग्रजाच्या विरोधात वर्तमानपत्रातून कडक लेख लिहिले, त्यांनी जनतेत स्वातंत्र्याप्रति जागृती निर्माण केली, भारतीयांना आपण सहज दाबून टाकू अशा गुर्मीत असणार्यात फिरंग्याना टिळकांची धास्ती वाटू लागली, त्यांनी टिळकांचा विविध मार्गानी छळ केला; पण टिळक मागे हटले नाहीत. देशाला ज्यांचा अभिमान वाटतो अशा टिळकांना निरपराध असूनही शिक्षा भोगावी लागली, त्या टिळकांची आठवण येताच हसरत नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन करतो’ –
या त्यांच्या भावना शब्दातून अशा व्यक्त झाल्या आहेत…

‘आजादीये हिंदकी ख्वाहिशको मक्बूले खवासो आम किया
दिल अहले सितम के बैठ गये, वो बाल तिलकने काम किया
सब हिंदके गर्म अखबारोमे, मज्मून लिखे कैसे कैसे
जिससे फिरंगी डरते थे उस कामको सर अंजाम किया
हो जौरो जफा या जुल्मो सितम, हटने के नही पीछे को कदम
जिसने ये कहा दब जाएंगे हम वल्लाह खियाले खाम किया
बलवंत तिलक ! अय फखरे वतन, बे जुर्म असीरे दामे मिहन
याद आई तिरी जिस दम, फौरन हसरत ने झुकके सलाम किया‘

टिळकांविषयी मोहानी यांना खूपच प्रेम होते. या प्रेमालाही काही कारणे होती. पारतंत्र्यात स्वत्व गमावून बसलेल्या जनतेत देशप्रेम, अस्मिता जागृत करण्याचे महान कार्य लोकमान्यांनीच केले. त्यामुळे त्यांचा अनुयायी होण्यात मला अभिमानच वाटतो. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो अशी प्रार्थना ते करत.

‘अय तिलक! अय इफ्तिखारे जज्बये हुब्बे वतन
हक शिनासो हक पसंदो हक यकीनो हक सुखन
तुझसे कायम है बिना आजादीये बेबाक की
तुझसे रोशन अहले इख्लासो वफा की अंजुमन….

हे टिळका! देशप्रेमाच्या भावनेला तुझ्यामुळे गर्व आहे. तू सत्यवचनी, सत्यप्रेमी, सत्याची पारख असलेला आणि सत्यनिष्ठ आहेस. तुझ्यामुळे निर्भीक स्वातंत्र्याचा पाया टिकून आहे. निष्ठावान देशसेवकांच्या बैठकीला तुझ्यामुळे तेज चढले आहे. तुझ्याकडून लोकांनी स्वाभिमानाचे धडे घेतले आहेत, देशभक्तांचे शत्रू खजील झाले. स्वातंत्र्य प्रेमाची आग तुझ्यात भडकली आहे. तुला मान-पान किंवा शारीरिक सुखाची पर्वा नाही. नाहीतर गुलामगिरीमुळे इंग्रजांची भाटगिरी करणे हाच लोकांचा धर्म बनला होता. हे भारताच्या सुपुत्रा, पाहिल्याप्रथम तूच देशाकरता तुरुंगात गेलास. तुझ्यामुळेच लोकांना स्वातंत्र्याचा मार्ग दिसला. नाहीतर तुझे देशबांधव गुलामीत सापडले होते. स्वाभिमानाची अशी जादू तू केलीस की, ज्यामुळे भाटगिरीची जुनी परंपरा कोलमडून पडली. स्वातंत्र्याचे महत्त्व सर्व लहानथोरांना पटले आणि फासावर चढण्याची भीतीही वाटेनाशी झाली. तुझे अनुयायित्व पत्करण्यात हसरतला अभिमान वाटतो. परमेश्वर तुला दीर्घायु करो.’
हसरत मोहानी यांनी ‘उर्दूये मुअल्ला’ हे नियतकालिक सुरू केले. स्वदेशीचा आग्रह धरला त्यामुळे अनेकदा त्यांना तुरुंगात जावे लागले. उर्दू साहित्यात त्यांचा जेवढा दबदबा होता तेवढाच दरारा त्यांचा राजकारणात होता. हसरत मोहानी यांची एक गझल खूपच लोकप्रिय आहे. ती म्हणजे ‘चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है’ प्रखर राष्ट्रवाद आणि आणि तितकीच हळुवार प्रेमभावना हे हसरत मोहानी यांचे वैशिष्ट्य होय.
डॉ. विनोद चंद्र पांडेय यांनीही टिळकांवर केलेली ‘तिलक बाल गंगाधर तुमको’ कविता प्रसिद्ध आहे.
तिलक बाल गंगाधर! तुमको, शत-शत बार प्रणाम हमारा।
पराधीनता के बंधन में, बंदी थी जब भारतमाता।
तुमने तन-मन-धन अर्पित कर, देश-प्रेम से जोड़ा नाता॥
युग-युग तक सारी दुनिया में, अमर रहेगा नाम तुम्हारा।
तिलक बाल गंगाधर! तुमको, शत-शत बार प्रणाम हमारा॥

- Advertisement -

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा