पुणे ः जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महत्वाच्या तीन ठिकाणी जम्बो रुग्णालय उभे करण्यात येणार आहे. परंतु, ही रुग्णालये उभी करण्यासाठी आणखी आठवडा दोन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत बेड अभावी रुग्णांची फरफट होऊ नये म्हणून ऑक्सिजन बेडस आणि व्हेटिंलेटर उपलब्ध करून द्यावेत. या रुग्णालयांसाठी महापालिका पैसे देईल असे आश्वासन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देताना राज्य शासनाने देखील हिस्सा उचलावा असे सूचक विधान यावेळी केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार आणि खासदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले, पुणे शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या प्रमाणात वैद्यकीय सुविधा वाढविण्याची गरज आहे. ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरची सुविधा असलेले बेड ही आगामी काळाची मोठी गरज आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण सापडल्यानंतर रुग्णांना बेड मिळायला पाहिजे, त्यांना सुविधा मिळायला पाहिजेत. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात उपचार सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. रुग्णालयाला द्यावा लागणार्‍या हिस्स्याच्या निधीबाबत विचारले असता पाटील म्हणाले, पुणे महापालिकेने मागील साडे तीन महिन्यात कोरोनासाठी सुमारे 300 कोटी खर्च केले आहेत. या तुलनेत राज्य सरकारकडून अगदी नगन्य रक्कम आली आहे. कोरोनामुळे महसूल कमी झाला आहे, जम्बो स्ठ रुग्णालयासाठी महापालिकेचा हिस्सा हा सुमारे 75 कोटी रुपयांचा आहे. महापालिका तो निधी देण्यास तयार आहे. परंतु शासनाने महापालिकेचा काही हिस्सा उचलावा, एवढीच आमची मागणी आहे. मात्र जम्बो रुग्णालय झाले पाहिजे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तसेच शरीरामध्ये ऍन्टीबॉडीज तयार झाल्या आहेत का नाही, याची तपासणी करण्याची सुविधा फक्त दिल्ली आणि मुंबईमध्ये आहे. त्यामुळे ही सुविधा पुण्यातही उपलब्ध करून देण्यात यावी. जेणेकरून नागरिकांना कळेल आपल्या शरीरात ऍन्टीबॉडीज तयार झाल्या आहेत का नाही. यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल, असेही पाटील यांनी सांगितले.

खासगी हॉस्पीटलला मोफत किट आणि मास्क द्या
काही रुग्णालये पीपीई किटची किंमत काही रुग्णालये 1300 रुपये लावत आहेत. धारावीमध्ये याची किंमत 150 रुपये आहे. ज्या रुग्णालयांना ज्या ब्रॅन्डचे पीपीई किट हवे असेल ते पुरविण्यात येईल. 10 पाहिजे असतील, तर 12 पीपीई किट पुरविण्यात येईल. यामुळे खासगी रुग्णालयांनासुध्दा परवडेल आणि रुग्णांना येणारे बील सुध्दा कमी येईल. या पार्श्वभूमीवर जास्त बिल आकारता कामा नये, अशी लेखी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

शिवसेनेसोबत जाण्याच्या वक्तव्यावर पाटील म्हणाले, जर महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे सरकार येणार किंवा नाही येणार याबाबत कोणालाच काहीही सांगता येणार नाही. परंतु, जरी ते आले, तरी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा, विधानसभा निवडणुका भाजप स्वबळावर लढणार आहे. देव्रेंद फडणवीस यांनी जो खुलासा केला तोच माझा बोलण्याचा मतीतार्थ होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा