पुणे ः कोणत्याही परिस्थितीत कोरोनाबाधित रुग्णाला वेळेवर बेड उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी बेडची संख्या वाढविणे गरजेचे असून, महापालिकेने यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करतानाच राज्य सरकार महापालिकांना कोरोनाबाबत निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
विधान भवन सभागृहात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील कोरोना व्यवस्थापन व नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाममंत्री दत्तात्रय भरणे आदींसह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांच्याबरोबरच राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात कोरोनावरील उपचारासाठी जम्बो रुग्णालय उभे करण्यासंदर्भात महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांनी त्यांच्या वाट्याचा 25 टक्के निधी देण्यास नकार दिला होता. त्यावर, महापौरांनी स्वतः निधी देण्यास हरकत नाही, परंतु, राज्य शासनाने महापालिकेला मदत करावी, अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री यांनी सद्य:स्थिती पाहता जिल्ह्यातील कोरोना प्रथम आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे, असे सांगितले.
वाढता रुग्णदर व मृत्युदर कमी करणे हे प्रशासनापुढे आव्हान असून, यासाठी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची गरज आहे, असे सांगून कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या हिताचे निर्णय घेताना सर्वांनी शासनाच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्यामध्ये सुसूत्रता येण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शीघ्र कृतिदल तयार करण्यात येत आहे. व्हेंटिलेटर, पीपीई किट, एन-95 मास्क पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून, गरजेनुसार त्या-त्या भागात पुरवठा करण्यात येत आहे, असे सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा