सोलापूर : सोलापूर शहर जिल्ह्यात काम करीत असलेल्या शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच सरकारी वकीलांच्या विरूध्द खोट्या तक्रारी देऊन मनस्ताप देणाऱ्या विरूध्द फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असणाऱ्या सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच सरकारी वकील हे लोकसेवक आहेत ते आपले कर्तव्य इमाने इतबारे नियमित आणि प्रामाणिकपणे पार पाडत असतात. काही विघ्नसंतोषी लोक विनाकारण आणि आपला वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच सरकारी वकीला विरूध्द खोट्या तक्रारी अर्ज देवून त्यांचे मनोबल खच्चीकरण करून त्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून त्यासंबधीच्या बातम्या काही साप्ताहिक, दैनिक, मासिकामध्ये छापून आणून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. लोकांमध्ये या लोकसेवकांबद्दल चुकीची भावना निर्माण करीत आहेत. अशा प्रवृत्तीमुळे शासकीय अधिकारी कर्मचारी व सरकारी वकीलांच्या मानसिकता बिघडत आहेत त्यांचे मनोबल कमी होत आहे. त्यातून सरकारची बाजू मांडण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होत आहे. अनेक प्रलोभने दाखवण्याचाही प्रकार यातून होत असल्याचे निर्दशनास आले आहे. या सर्व बाबीवर विचार विनियम करून अशा प्रवृत्तीला आळा घालण्याच्या दृष्टीने प्रयत्न म्हणून जो व्यक्ती, संस्था अशा खोट्या तक्रारी अर्जाने शासकीय अधिकारी कर्मचारी आणि सरकारी वकीलांच्या कामात अडथळा निर्माण करून त्यांचे मनोबल खच्चीकरण करेल त्याच्या विरूध्द फौजदार गुन्हे दाखल करणार आहे. जर शासकीय अधिकारी कर्मचारी व सरकारी वकील चुकीचे काम करीत असतील त्यांच्या बाबत तक्रार करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु खोट्या तक्रारी करणे हे चुकीचे आहे. त्याचबरोबर खोट्या तक्रारी अर्जावरून बातम्या छापताना संबधीत संपादक आणि पत्रकारांनी त्याची खात्री करावी वस्तुस्थितीची माहिती घ्यावी असेही अॅड प्रदिपसिंग राजपूत यांनी सांगितले. यापुढील काळात कोणीही शासकीय अधिकारी कर्मचारी व सरकारी वकीला विरूध्द खोट्या तक्रारी अर्ज किंवा गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या विरूध्द फौजदारी अजामीनपात्र गुन्हे दाखल करणार आहे याबाबत पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांनाही कळवण्यात आल्याचे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा