हमीपत्र देऊन विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेशाची संधी
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना, दहावीचे ऑनलाइन गुणपत्रिका अपलोड करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्याकडे एखादे प्रमाणपत्र किंवा कागदपत्रे उपलब्ध नसल्यास त्याला प्रवेशासाठी हमीपत्र लिहून द्यावे लागणार आहे. तर, शैक्षणिक कागदपत्रे जमा करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय अकरावी प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी दिली आहे.
केंद्रीय अकरावी प्रवेश नियंत्रण समितीद्वारे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरून अर्ज भरायचा आहे. अर्ज भरताना विविध कागदपत्रे लागतात. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना सरकारी कार्यालयांकडून प्रमाणपत्रे किंवा कागदपत्रे मिळण्यास उशीर होऊ शकतो. त्याचप्रमाणे दहावीच्या गुणपत्रिका शाळांकडून मिळण्यात उशीर होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन समितीने हा निर्णय घेतला आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी यंदा विद्यार्थ्यांना दहावीची ऑनलाइन गुणपत्रिका अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांकडे शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास (डोमीसाइल) प्रमाणपत्र, जातीचा दाखला प्रगत उत्पन्न गटात एनसीएल मोडत नसल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध असतील अशा विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना ते अपलोड करावे. मात्र संबंधित प्रमाणपत्र नसल्यास अपलोड करण्यासाठी बंधनकारक करू नये. अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडे ही प्रमाणपत्रे नसल्यास किंवा ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यास अडचण निर्माण झाल्यास, त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घ्यावे; तसेच प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश हा त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची माहिती; तसेच हवी पत्राच्या आधारे देण्यात येणार असून, त्याची सर्वस्वी जबाबदारी ही विद्यार्थ्यांची राहील, असेही शेंडकर यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा