जयपूर : राजस्तानमधील सत्तानाट्य सुरूच आहे. विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलाविण्यासाठी गेहलोत सरकारने नव्याने प्रस्ताव पाठविला आहे. येत्या 31 जुलै रोजी अधिवेशन बोलाविण्यात यावे, अशी विनंती राज्यपाल कलराज मिश्रा यांना केली आहे. गेहलोत यांनी राज्यपालांना पाठविलेला हा तिसरा प्रस्ताव आहे.

गेहलोत यांनी पाठविलेला सुधारित प्रस्ताव राज्यपालांनी परत पाठवला होता. त्यानंतर काल सकाळी गेहलोत यांनी बैठक बोलावली. या बैठकीत प्रस्तावावर नव्याने चर्चा करण्यात आली आणि राजभवनकडे पाठविण्यात आले.

या बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सिंह यांनी सांगितले की, 31 जुलै रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले जावे, अशी आमची मागणी आहे. अधिवेशन बोलावणे आमचा हक्क असून, कायदेशीर अधिकारही आहे. त्यामुळे आम्ही नव्याने प्रस्ताव पाठवला आहे.

राज्यपालांबरोबर आमचे कोणतेही मतभेद नाहीत. नाराजी अथवा स्पर्धाही नाही.राज्यपाल हे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत,असेही सिंह यांनी सांगितले.

सचिन पायलट यांच्या बंडखोरीनंतर राजस्तानमध्ये सत्तानाट्य सुरू झाले आहे. पायलट यांनी आपल्याकडे 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. तर, गेहलोत यांचा स्पष्ट बहुमताचा दावा आहे. त्यासाठी त्यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची मागणी केली आहे. त्यांचा पहिला प्रस्ताव राज्यपालांनी फेटाळला होता. त्यानंतर सुधारित प्रस्ताव पाठविण्यात आला. तसेच, गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपालांविरोधात तक्रार केली होती. त्यावर, राज्यपालांनी अधिवेशन बोलावले जाऊ नये, असा आपला कधीच प्रयत्न नव्हता, असे सांगत गेहलोत सरकारकडून काही माहिती मागविली होती.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा