पुणे : श्रावण महिन्यातील धार्मिक विधी, सत्यनारायण पूजा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुरोहितांना घरोघरी जाऊन करणेे शक्य नाही. त्या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून पुण्यातील काही तरुणांनी ‘मीट 60’ या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून घरबसल्या मोफत पूजा-विधी करण्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. प्लेस्टोअरवर हे अ‍ॅप मोफत उपलब्ध आहे.

लॉकडाऊनमुळे विनाकारण बाहेर फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यातच सणांचा श्रावणमास सुरू झाल्याने अनेकांना घराघरात व्रत-वैकल्य-पूजा-अर्चा-अभिषेक असे धार्मिक कार्यक्रमांचे तिथी, मुहूर्त पाहून आयोजन केले जाते. परंतु, लॉकडाऊनमुळे पूजेसाठी यजमानाच्या घरापर्यंत जाणे पुरोहितांना शक्य नाही. तर, पुरोहितांशिवाय पूजा सफल होत नसल्याची खंत मनात कायम राहत असल्याने यजमानांना-देखील कुठलाच धार्मिक विधी करता येणे अशक्य!

त्यामुळे यजमानांना आता गुरुजी आले नाहीत म्हणून अडून बसण्याची गरज नाही, ना गुरुजींना उद्योग नाही म्हणून रिकामे बसण्याची गरज. पुण्यातील हिमांशू रत्नपारखी आणि त्याच्या सहकार्‍यांनी ऑनलाइन यंत्रणेचा पुरेपूर फायदा घेऊन ‘मीट?60’ मोबाईल अ‍ॅप तयार करून यजमान आणि गुरुजी यांना घरबसल्या जोडण्याचे काम केले आहे.

यजमान किंवा पुरोहित यांना हे मोबाईल अ‍ॅप आपल्या ’गुगल प्ले स्टोअर’ वरून डाऊनलोड करता येणार आहे. तसेच, गुरुजींची सेवादेखील विनाशुल्क असून यजमानाने गुरुजींना पूजा झाल्यावर ऐच्छिक दक्षिणा देण्याची सुविधा ठेवली आहे. त्यामुळे श्रावणातील पूजा-विधी पुरोहितांमुळे अडकून पडणार नाही.

हे विधी करता येतील

यजमानांना श्रावणमासात होणारे रुद्राभिषेक, मंगळागौर पूजा, गुरुवारी महालक्ष्मी व्रत, हरतालिका पूजन, श्री गणेश प्राणप्रतिष्ठा, नवरात्रातील देवीचे पाठ, अधिकमास पोथी आदी.

श्री रूद्राभिषेकासाठी 10 आणि 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता, तर सत्यनारायण पूजेसाठी 29 जुलै, 3, 12, 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पुरोहित उपलब्ध असणार आहेत. अधिक माहितीसाठी 83809 48134, 9766516556 या क्रंमाकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा