हर्षवर्धन पाटील यांची टीका

इंदापूर, (वार्ताहर) :?इंदापूर तालुक्यात गेले काही दिवसांपासून कोरोनाचे संकट गंभीर बनले असून, संसर्ग रोखण्यासाठी शासकीय पातळीवर प्रभावी उपाययोजना होण्याची गरज आहे. मात्र तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेले राज्यमंत्री हे गर्दीत सूरपाट्या खेळून व स्वतःचे छायाचित्र असलेले पतंग उडवून सध्याच्या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करीत आहेत. राज्यमंत्र्यांनी आपली निष्क्रियता झाकण्यासाठी सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात पोरकटपणाने वागून व स्टंटबाजी करून जनतेच्या जीवाशी खेळू नये, अशी टीका भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

इंदापूर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दररोज वाढत असून रुग्णांची संख्या 125 च्या पुढे गेली आहे, मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यमंत्री भरणे यांच्याकडून शासकीय पातळीवर तालुक्यात प्रभावी उपाययोजना राबविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. इंदापूर कोविड सेंटरमध्ये सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तालुक्यात भिगवण व इतर ठिकाणी कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन कोविड सेंटर उभारणे गरजेचे आहे. नागरिकांच्या ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रीटमेंटकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच कोविड रुग्णासाठी व्हेंटीलेटर व उपचाराची सुविधा इंदापूर येथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणे गरजेचे आहे. राज्यातील इतर मंत्री तसेच लोकप्रतिनिधी हे यासंदर्भात बैठका, दौरे काढून प्रभावी उपाययोजना करीत असताना इंदापूर तालुक्यात मात्र लोकप्रतिनिधी असलेले राज्यमंत्री हे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करण्यात व्यस्त आहेत, अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा