पिंपरी : कोरोना रुग्णाच्या प्रकृतीची माहिती नातेवाईकांना मिळणार हेल्पलाइनद्वारे रूग्णांची माहिती नातेवाईकांना आता हेल्पलाईनद्वारे मिळणार आहे. पालिका वायसीएममध्ये कॉल सेंटर उभारणार आहे. त्याकरिता प्रशिक्षित 40 समाजसेवकांची भरती केली जाणार आहे. हॉस्पिटलमधील प्रत्येक मजल्यावर त्यांची व्यवस्था केली जाणार आहे. रुग्णांचे नातेवाईक, नगरसेवक आणि रुग्ण यांच्यातील दुवा साधण्याचे काम ते करणार आहेत. याबाबतची माहिती पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

महापालिकेचे वायसीएम रुग्णालय कोविड समर्पित घोषित केले आहे. कोरोना बाधित रुग्णांवर या रुग्णालयात उपचार केले जातात. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नातेवाईकांना रुग्णाच्या जवळ जावू दिले जात नाही. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यावर त्याच्याकडे मोबाइल देखील दिला जात नाही. त्यामुळे रुग्णाच्या प्रकृतीची माहिती नातेवाईकांना मिळत नाही.

उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यास डॉक्टर, परिचारिकांना नातेवाईकांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागते. त्याच्या लागोपाठ दोन घटला घडल्या आहेत. रविवारी दोन रुग्णांच्या मृत्यूनंतर डॉक्टरांना नातेवाईकांच्या संतापाला सामोरे जावे लागले. एका घटनेत तर त्रासदायक जमाव टाळण्यासाठी डॉक्टरांना खोलीत बंदिस्त करावे लागले होते. त्याचदिवशी सायंकाळी नगरसेवक थेट मृत्यू झालेल्या रुग्णाजवळ गेले. त्यावरुन डॉक्टर आणि नगरसेवकामध्ये वादावादी झाली. या दोनही प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांमुळे प्रशासनाने नातेवाईकांना माहिती देण्यासाठी हेल्पलाईन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतची माहिती देताना आयुक्त हर्डीकर म्हणाले, नातेवाईकांचा रुग्णांशी संपर्क होऊ शकत नाही. त्यांना रुग्णांची योग्य माहिती मिळत नाही. त्यासाठी वायसीएममध्ये तीन ते चार दिवसात कॉल सेंटर तयार करुन नागरिकांसाठी हेल्पलाईन तयार केली जाणार आहे.

समाजकार्य पदवी घेतलेल्या (एमएसडब्ल्यू) 40 जणांची भरती करणार आहोत. त्याची भरती प्रक्रिया सुरु केली आहे. त्यांची व्यवस्था हॉस्पिटलमध्ये प्रत्येक मजल्यावर केली जाणार आहे. जेणेकरुन रुग्णांचे नातेवाईक, नगरसेवक आणि रुग्ण यांच्यातील दुवा साधण्याचे काम करणार आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा