पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये रविवारी रात्री एका नगरसेवकाने डॉक्टर कर्मचार्‍यांना रुग्णसेवेवरुन शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील सर्व निवासी डॉक्टरांनी सोमवारी सकाळी रुग्णालयाबाहेर कामबंद आंदोलन सुरु केले होते. महापालिकेतील पदाधिकार्‍यांनी या संदर्भात केलेल्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

या संदर्भात महापालिकेत एक बैठक झाली या बैठकीस महापौर, पदाधिकारी व आयुक्त श्रावण हर्डीकर व अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये निवासी डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रुग्णालयाच्या गेटवर पोलीस तैनात करण्यात येणार असल्याचे तसेच डॉक्टरांच्या रात्रीचे वेळी अचानक उद्भवणार्‍या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी एका जबाबदार वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्‍याची नेमणूक करण्यात येणार आहे.

उपस्थित डॉक्टरांनी मानधन वाढी बाबत मुद्दा उपस्थित केला होता त्यानुषंगाने वरिष्ठ निवासी डॉक्टरांचे मानधन 65 हजारावरुन 75 हजार व कनिष्ठ निवासी डॉक्टरांचे मानधन 55 हजारावरुन 65 हजार इतकी वाढ केली असल्याचे स्पष्ट केले. तसेच नगरसेवक व पदाधिकारी यांचे रुग्णासंदर्भातील समस्याचे निराकरण करणेसाठी वायसीएम रुग्णालयामध्ये स्वतंत्र कक्ष निर्माण करणेत येणार आहे.

त्याचबरोबर वायसीएम रुग्णालयामध्ये दाखल असणार्‍या रुग्णांची माहिती दर्शविणारा फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्याच्या सुचना देण्यात आल्या. सद्या सर्वच रुग्णांलयावर कामाचा ताण असताना देखिल रुग्णालयातील नर्सेसच्या सर्वेक्षणासाठी नेमणूका केलेल्या आहेत. त्यांच्या ऐवजी आशा वर्करला प्रशिक्षित करुन या सर्वेक्षणाच्या कामासाठी त्यांची नेमणूक करण्यात येणार आहे व उपलब्ध होणार्‍या नर्सेसच्या नेमणूका रुग्णालयामधील अतिदक्षता विभागामध्ये करण्यात येणार आहेत.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहाता बालनगरी व ऑटो क्लस्टर येथे जम्बो रुग्णालय तयार करण्यात येत असुन त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिन व आयसीयु बेड ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याबाबतचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.

दरम्यान ही घटना घडल्यानंतर भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी तातडीने वायसीएम रुग्णालयास समक्ष भेट देऊन येथील डॉक्टरांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा