मुंबई : राज्यातील वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल आकारले असून त्याची मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली. या वीज आकारणीला तात्काळ अटकाव बसावा. महावितरण, बेस्टसह खासगी वीज कंपन्यांना समज द्या, अन्यथा या वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल, असे सांगतानाच कोरोना असला तरी अशा विषयात मनसे गप्प बसेल अशी चुकीची समजूत करून घेऊ नका, असा सूचक इशारा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे दिला.

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ग्राहकांना आलेल्या अवास्तव वीज बिलाकडे लक्ष वेधले आहे. कोरोनाच्या लढाईत राज्य सरकारचे बहुदा एका महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष होतंय किंवा जनतेच्या तीव्र भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नसाव्यात म्हणून हे पत्र लिहित आहे, अशी पत्राची सुरुवात करून राज यांनी मुख्यमंत्र्यांकडे ग्राहकांच्या समस्यांना वाचा फोडली आहे. बेस्ट, महावितरणसह सर्वच खासगी वीज कंपन्यांनी ग्राहकांना वीवज बिलांचा जबरदस्त शॉक दिला आहे. जून महिन्यांची वीज बिलं तर डोळे पांढरी करणारी आहेत. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांची सरासरी वीज बिलं पाठवल्यानंतर त्या तीन महिन्यांत विजेचा झालेला वापर आणि सरासरी विजेची बिलं याच्यातील तफावत जून-जुलै महिन्यांत ग्राहकांच्या माथी मारण्यात येत आहे. या तफावतीच्या नावाखाली बिलांच्या ज्या रकमा आकारल्या गेल्या आहेत. त्यावरून त्याला तफावत न म्हणता लूटच म्हणावी लागेल, अशी टीका राज यांनी केली.

टाळेबंदी व्यावसायिक अस्थापने तीन महिने बंदच होती. तरीही सरासरी वीज बिलांच्या नावाखाली अवाच्यासवा बिलं आकारली गेली आहेत. टाळेबंदीमुळे बरेच व्यवसाय ठप्प झाले आहेत. बऱ्याच ठिकाणी पगारकपात झाली आहे. तर काही अस्थापनांनी नोकरकपात सुरू केली आहे. असे असताना ही वीज बिलं म्हणजे सामान्यांच्या मोडलेल्या कंबरड्यावरचा प्रहारच आहे,असे त्यांनी म्हटले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा