संदेश जीवन विद्येचा :वामनराव पै

भूतमात्रांत माणसासकट सर्व प्राणी, पक्षी, जलचर सर्व पाहिजे. कावळा, चिमणी, सर्प, नाग हे सगळेच पाहिजे. सर्व भूतमात्र मिळूनच पर्यावरण होते. पर्यावरण, पर्यावरण म्हणजे काय? एकमेक एकमेकांवर अवलंबून आहोत हेच पर्यावरण! एकमेक एकमेकांवर अवलंबून असण्याची जी व्यवस्था त्याला पर्यावरण म्हणतात. ही एक साखळी आहे. हया साखळीतील एक जरी लुप्त झाले तरी सर्वांवर त्याचा परिणाम होतो. उदा. गिधाडे आता लुप्त झालेली आहेत त्यामुळे कितीतरी परिणाम झालेला आहे. निसर्गात जी घाण किंवा कुजलेल्या वस्तू असतात त्या फस्त करण्याचे काम गिधाडे करतात. गिधाडे कमी झाल्यामुळे ती घाण तशीच रहाते व त्यातून रोग निर्माण होतात व ते रोग माणसापर्यंत येवून पोहचतात. आपण एकमेकांना असे जोडलेले आहोत व एकमेकांवर अवलंबून आहोत. केवळ माणसे एकमेकांवर अवलंबून असतात असे नव्हे तर आपण इतर प्राण्यांवरही अवलंबून आहोत पण आपल्याला हे कळत नाही. पर्यावरण राखा, पर्यावरण राखा असे जे सांगितले जाते त्याचे कारण हे आहे. पर्यावरण राखणे म्हणजे फक्त वृक्ष जोपासणे नव्हे. वृक्ष तर जोपासले पाहिजेतच, वृक्षांचे संवर्धन केले पाहिजेच पण त्याचबरोबर इतरही घटक पाहिजेत. सर्व उपयुक्त आहे म्हणून सर्वं खल्विदम् ब्रम्ह असे म्हटलेले आहे. ब्रम्हाचा मी वेगळा अर्थ लावला. जगांत जे जे निर्माण झालेले आहे ते सर्व उपयुक्त आहे. धर्म धर्म म्हणून आपण ज्याला म्हणतो त्या धर्माची उपासना, जोपासना ही व्हायलाच पाहिजे पण तो धर्म म्हणजे मानवधर्म. मानवधर्म म्हणजे माणसाने माणसासारखे वागावे, रहावे, एकमेकांशी तसे संबंध ठेवावे. असे जर झाले नाहीतर आज जगांत जे चाललेले आहे तसेच चालणार. माझे म्हणणे असे की मुलांना मानवधर्माचे संस्कार दया. मानवधर्मात कशांत आहे हे थोडक्यांत सांगायचे म्हणजे समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णूता, समाधान, नम्रता, लवचिकता, कृतज्ञता. मानवधर्मात हया आठ गोष्टी आहेत. हया आठ गोष्टी शिकविल्यात की जग सुखी झाले. जग सुखी व्हायला किती वेळ लागतो. आज धर्माची जी शिकवण दिली जाते त्याने माणसे आंकुचित होतात, संकुचित होतात. त्या संस्काराने तुमची बुध्दी, मन संकुचित होते. ते इतके संकुचित झालेले आहे की प्रत्येक व्यक्ती स्वार्थी झालेली आहे. त्या स्वार्थाच्यापोटी तो काही करायला तयार होतो. वाघ कितीही भूक लागली तरी चारा खाणार नाहीतसे काहीही झाले तरी माणसाने माणसासारखेच वागले पाहिजे. समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णूता, समाधान, नम्रता, लवचिकता, कृतज्ञता हया आठ गोष्टीत धर्म आहे. हयातला कुठलाही गुण जरी आला तरी बाकीचे गुण तिथे येतात. हयातला सर्वात महत्वाचा गुण म्हणजे कृतज्ञता. तसे म्हटले तर सर्वच गुण महत्वाचे आहेत. मुलांना कृतज्ञतेची शिकवण दयावी.

(सौजन्य : जीवन विद्या मिशन)

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा