बाळासाहेब थोरात यांची टीका

पुणे : जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत. तरी पेट्रोल, डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही वाढ म्हणजे केंद्र सरकारने सामान्यांच्या खिशावर घातलेला दरोडा आहे. अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी केली.

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ थोरात यांच्या नेतृत्वाखाली पुणे काँग्रेसने सोमवारी टिळक चौकात धरणे आंदोलन केले. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. रोहित टिळक, अभय छाजेड, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, दिप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यावहारे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

थोरात म्हणाले, माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्या काळात कच्च्या तेलाचा जागतिक बाजारपेठेत एका बॅरलचा दर 135 डॉलर होता. तो आता केवळ 16 डॉलर आहे, असे असतानाही देशात पेट्रोल व डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. देशात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने नागरिकांना मदत करणे गरजेचे आहे. मात्र, कच्च्या तेलाचे दर कमी असतानाही पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढवल्या जात आहेत. ही दरवाढ म्हणजे, केंद्राने सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा आहे. देशातील सर्वसामान्यांचे दु:ख मांडण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्ष आज देशभरात रस्त्यावर उतरला आहे. केंद्र सरकारने त्वरीत हि दरवाढ मागे घ्यावी, आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी थोरात यांनी केला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करणार्‍या घोषणा दिल्या.

निष्काळजीपणामुळेच कोरोना रुग्ण संख्येत वाढ

पुणे : लॉकडॉऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरही कोरोनाचा संसर्ग पसरत आहे. परंतु, नागरिकांनी बिनधास्त न राहता मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ करणे आणि शारिरीक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास कोरोनाचा संसर्ग थांबवू शकतो, असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना साथरोग नियंत्रण विभागीय आढावा बैठक महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीत त्यांनी सूचना केल्या. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल तसेच सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, येत्या काळात आपल्याला कोरोनासोबत जगण्याची लढाई लढावी लागणार आहे. मान्सूनच्या काळात वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता योग्य ते नियोजन करुन रुग्ण संख्या कमी करण्याबरोबरच मृत्यूदराचा आलेख शून्यावर आण्यासाठी सर्वांना मिळून समन्वयाने काम करावे लागणार आहे. मालेगाव शहरात कोरोना प्रतिबंधासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घ्या. याचा उपयोग पुणे शहराबरोबरच विभागात इतरत्र परिस्थिती निहाय उपयोगी पडेल का ? याबाबत माहिती घ्या. तसेच सामूहिक संसर्ग होणार नाही याकडे विशेष लक्ष द्या, ग्रामीण भागात कोरोना विषाणूची भीती घालविण्यासाठी जनजागृतीवर भर द्या, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा