चंद्रभागा नदीत स्नानास आणि कळस दर्शनाला मनाई

सोलापूर, (प्रतिनिधी) : आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात आणि परिसरातील १० गावांमध्ये आज (मंगळवारी) दुपारी दोन वाजल्यापासून दि.२ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात येण्यास नऊ पालख्यांना परवानगी देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लाखो वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचा आषाढी एकादशी सोहळा जवळ येऊन ठेपला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व आषाढी एकादशीच्या धार्मिक पूजा मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पार पडण्यासाठी राज्य सरकार व सोलापूर जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यादृष्टीने सोलापूर जिल्हा प्रशासनाने महापूजाचे नियोजन केले आहे. आषाढी निमित्त सोलापूर जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती देण्यासाठी सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी सोमवारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.

यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील बोलत होते. यंदाच्या आषाढी वारीसाठी पंढरपूरमध्ये येण्यास महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील नऊ मानाच्या पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी, संत तुकाराम महाराज संस्थान देहू, संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव, संत सोपानदेव महाराज संस्थान, सासवड, संत एकनाथ महाराज संस्थान पैठण, संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान, त्र्यंबकेश्वर, विठ्ठल रुक्मिणी देवस्थान जिल्हा अमरावती, संत चांगावटेश्वर महाराज देवस्थान, सासवड यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार पूजा

आषाढीवारी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा होणार असून मानाच्या वारकर्‍यांना देखील यंदा या पूजेचा मान मिळणार आहे. पास असणार्‍यांनी पंढरपूरला यावे ज्यांना प्रशासनाने पास दिले आहेत. अशाच मोजक्या व्यक्तीने आषाढीवारी निमित्त पंढरपूरला यावे, ज्यांच्याकडे पास नाहीत त्यांनी येऊ नये असेही पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

महापूजेचा मान विठ्ठल बढे यांना

आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी मानाचा वारकरी ठरला असून मंदिरात वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे (वय- 84 रा. चिंचपूर पांगुळ जिल्हा-अहमदनगर) यांना मान मिळाला आहे. वारीच रद्द झाल्याने मानाचा वारकरी कोण असणार याकडे राज्यातील भाविकांचे लक्ष लागले होते. मंदिर समितीने बैठक घेऊन मानाचा वारकरी ठरवला आहे. विठ्ठल बढे हे मंदिराला वीणेची सेवा देतात. त्यांना हा मान देण्यात आला. बढे आता मुख्यमंत्र्यांसोबत पूजा करणार आहेत. सफाई कामगाराला मानाचा वारकरी करा अशी मागणी नगरसेवक कृष्णा वाघमारे यांनी केली होती. तर शेतकरी संघटनेने शेतकर्‍याला मान देण्याची मागणी केली होती. मात्र या दोन्ही मागण्या अमान्य करीत समितीने विठ्ठलाची अखंड सेवा करणार्‍या वारकर्‍याला ही संधी दिली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा