डॉ. श्रीकांत वाघ यांचे प्रतिपादन

पुणे : कालिदास हे एक अभिजात संस्कृत लेखक होते, त्यांना भारतीय संस्कृत भाषेतील महान कवी आणि नाटककार म्हणून व्यापकपणे ओळखले जाते. त्यांची नाटके आणि कविता प्रामुख्याने वेद, रामायण, महाभारत आणि पुराणांवर आधारित आहेत. कालिदास यांनी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले, असे प्रतिपादन संस्कृत भाषेचे अभ्यासक डॉ. श्रीकांत वाघ यांनी केले.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शताब्दीनिमित्त ‘मेघदूतातील कालिदास’ या विषयावर संस्कृत भाषेचे अभ्यासक डॉ. श्रीकांत वाघ यांचे फेसबुकच्या माध्यमातून सोमवारी व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. वाघ म्हणाले, कालिदासांच्या सप्त साहित्यात तीन नाटके, दोन खंडकाव्ये आणि आणि दोन महाकाव्यांचा समावेश होतो.मारसंभव, मेघदूत व रघूवंश ही तीन काव्ये त्यांनी उस्फूर्तपणे रचली, अशी एक कथा आढळते. रघुवंश व कुमारसंभव ही महाकाव्ये, ऋतुसंहार व मेघदूत ही खंडकाव्ये आणि मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय व अभिज्ञान शाकुंतल ही नाटके त्यांनी लिहिली.

एका समृद्ध संस्कृतीचे, अभिजात कलाविलासाचे आणि उन्नत सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब कालिदासांच्या साहित्यातून उमटलेले दिसते. वेद, उपनिषदे, भगवद्गीता, रामायण, महाभारत आदी प्राचीन साहित्य, षड्दर्शने व अन्य विविध शास्त्रे, संगीत, नृत्य, चित्रादी ललित कला यांचे मर्मदर्शी उल्लेख त्यांच्या साहित्यात आढळतात त्यावरून विद्वत्ता आणि रसिकता यांचा मनोज्ञ संगम त्याच्या व्यक्तिमत्त्वात झाला होता, हे स्पष्ट दिसते. शृंगार आणि करूण ह्या दोन रसांचा परिपोष कालिदासाच्या साहित्यकृतींत प्रामुख्याने आढळतो. विविध भाषालंकार त्यांच्या काव्यनाटकांत आढळतात.

संस्कृत भाषेमधील महान साहित्यकार कालिदास यांचे साहित्य हजारो वर्षापासून सर्वाना प्रेरणादायी ठरले आहे. कालिदास यांच्या साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय संस्कृत भाषेचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही, असेही यावेळी डॉ. वाघ यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा