मुंबई : इंग्लंडमध्ये २०१९ साली पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून भारतीय संघाला मात स्विकारावी लागली. संपूर्ण स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीची संथ फलंदाजी हा चर्चेचा विषय होता. या स्पर्धेनंतर निवड समितीने धोनीला भारतीय संघात स्थान दिले नाही. सुमारे वर्षभराचा काळ धोनी भारतीय संघाबाहेर आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामात धोनी क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार होता, मात्र कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे धोनीचे हे पुनरागमन लांबणीवर पडले. मात्र भारतीय संघाचा फिरकीपटू कुलदीप यादवच्या मते, संघातील सर्व खेळाडूंना धोनीची आठवण येत असून त्याने पुन्हा भारताकडून खेळण्यास सुरुवात करायला हवी.

आम्हा सर्वांना धोनीची आठवण येते आहे. मी स्वतःचा त्याचा मोठा चाहता आहे. त्याने लवकरात लवकर संघात पुनरागमन करावे असे माझे मत आहे, त्याने पुन्हा भारतीय संघाकडून खेळण्याचा विचार करायला हवा. तो नेहमी आम्हाला चांगले मार्गदर्शन करत असतो. ज्यावेळी आम्ही मैदानावर सरावाला उतरतो, त्यावेळी तो वेळात वेळ काढून आम्हाला टिप्स देतो. आमच्या प्रत्येक खेळाडूसाठी त्याच्या टिप्स फायदेशीर ठरतात, असेही कुलदीप एका मुलाखतीत म्हणाला.

धोनी कधीही सामन्याआधी फारसे काही सांगण्यात मानत नाही. तो सामना सुरु असताना परिस्थिती पाहून आम्हाला टिप्स देतो. मैदानावर असताना त्याला काही गोष्टी झटकन सुचतात आणि तशा पद्दतीने तो आम्हाला सांगतो. याव्यतिरीक्त रोहित, विराट सारखे वरिष्ठ खेळाडूही वारंवार मार्गदर्शन करत असतात असे कुलदीपने सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा