समृद्धी धायगुडे

कोरोनाने आपल्या जगण्याचा पाया भूसभूशीत करून टाकला आहे. गेल्या ७८ दिवसांपासून आपल्याला घरात रहावं लागतंय. आपलं घर असलं तरी आपण त्यात किती राहतो हा प्रश्नच आहे. पण गेल्या दोन तीन महिन्यात आपल्या घराचा कोपरा न कोपरा आपल्याला आता पाठ झाला असेल. पण हेच घर पर्यावरणपूरक पद्धतीने बांधलं तर तिथे राहणं आणखी सुखकर होईल.आता पर्यावरणपूरक वगैरे शब्द डोळ्यासमोर आले की कपाळावर आठ्या येणं स्वाभाविक आहे. पण हे तितकंसं कठीण नाही. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे थोडा वेळही आहेच. शिवाय पर्यावरण दिनही आहेच. तर दीन झालेल्या या पर्यावरणात काहीतरी चांगलं आणि वेगळं कसं घडवता येईल आणि हे घडवणारी माणसं कोण हे जाणून घेऊया.

अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या प्रमुख तीन गरजांपैकी तिसरी म्हणजे निवारा. ही गरज म्हणजे आता प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. शहराच्या मध्यवस्तीत दोन किंवा तीन बेडरूमचा निदान एक बेडरूमचा फ्लॅट किंवा बैठे घर, पेंटहाऊस असावे. पण असे स्वप्न बघताना आपण किती प्रदुषण करणार? किती काळ आपले स्वप्न हे टिकाऊ असणार आहे. याचा विचार फारसा होत नाही. भारतापेक्षा परदेशात छोट्या घरात थोडी फार डागडुजी करून छान मेक ओव्हर करून राहणे अगदी सामान्य झाले आहे.

आजच्या जागतिकीकरणात कोणत्याही प्रकारचा संसर्ग थांबवणे काहीसे अशक्य आहे कोरोना विषाणूने दाखवून दिले आहे.असं असलं तरी तरी परंतु असे विषाणू तयार होऊ नयेत किंवा झाले तरी यातून टोकाचे संसर्ग होऊ नयेत, संसर्ग झाले तरी तो नियंत्रणात राहील असे काही प्रयत्न आज पासूनच आपल्या वैयक्तिक आयुष्यात करू शकतो का? कुठून सुरवात करू? असे सगळे प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर आज आपण काही वेगळी पण आपल्या मूलभूत गरजांशी निगडीत गोष्टींची माहिती घेऊ :

मानावाच्याच उत्क्रांतीच्या टप्प्यात अन्न, निवारा या प्रमुख गरजा होत्या ज्या पूर्णपणे निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टींपासूनच पूर्ण केल्या जात असे. आज आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर या सर्व पारंपरिक पद्धती मागे टाकत आंधळेपणाने धावत आहोत. कोरोनाच्या निमित्ताने लॉक डाऊन केल्यानंतर निसर्गात झालेले आमूलाग्र सुंदर बदल आणि गेल्या आठवड्याभरात होणारे भयानक बदल या दोन्हीचे आपण साक्षीदार आहोत. यातील आपल्याला सुखावह ठरलेला बदल म्हणजेच अर्थातच लॉक डाऊनच्या काळातील असेल. यावरून धडा घेत जर आपण आता पासून काही पावले उचलली तर निश्चितच आपली पुढची पिढी पर्यावरणाचा आदर राखण्यास शिकेल तो ही प्रयत्नपूर्वक केवळ सोशल मीडिया स्टेटस किंवा व्हिडीओ पुरता नाही.

आपण एका परिपूर्ण पर्यावरण पूरक जीवनशैली जगू इच्छित असाल तर त्याची सुरवात स्वतःपासून करा. यामध्ये घर हा अतिशय महत्वाचा भाग ठरतो. कारण माणूस जन्माला आल्यापासूनच निसर्गाची हानी करायला सुरवात करतो पण निदान समाज आल्यानंतर तरी आपण पर्यावरणाची हानी होणार नाही असा विचार करून जर आपले घर बांधले किंवा ज्यांना नूतनीकरण करायचे असेल त्यांनी हा विचार करून केले तरी निश्चितच पर्यावरण दिनाचा उद्देश्य काहीसा सफल होईल.

आता तुम्हाला प्रश्न पडेल अशी घरे कोण बांधून देते आम्हाला काहीच माहिती नाही त्यासाठी स्थानिक प्रशासन किंवा केंद्र सरकार काय मदत करते आम्ही पर्यावरण पूरक जीवनशैली आचरणात आणण्यासाठी काय काय करू शकतो. तर सुरवातीला आपण भारतातील काही वास्तुविशारदांची माहिती घेऊ…

भारतात ही विशेषतः केरळ, राजस्थान, बंगळुरू, महाराष्ट्र यासारख्या राज्यात काही पर्यावरण पूरक वास्तुविशारदांनी घरे बांधली आहेत.सध्या ऑरगॅनिक आणि सस्टेनेबल जीवनशैलीचे फॅड आले आहे. पण खरंच पर्यावरण पूरक जगण्यासाठी तसे निवास बांधला तर जास्त फायदेशीर ठरते माणूस म्हणून आणि पर्यावरणाच्या दृष्टीने देखील हे दीर्घकाळ टिकणारे ठरते. आता तुम्हाला प्रश्न पडेल शहरात हे कसे शक्य होईल? तर आपल्या देशात काही सरकारी इमारती पूर्णपणे पर्यावरणपूरक आणि अपारंपारिक ऊर्जास्रोतांचा वापर करत आहेत. या स्वरूपाचे बांधकाम करणारे काही कौशल्यपूर्ण विकासक देखील उपलब्ध आहेत, परंतु तुलनेने त्यांची संख्या कमी आहे.

आता थोडे मागे जाऊन बघू, आपल्या आजूबाजूला काही जुने वाडे किंवा बैठी घरे यांची रचना बघा, वर्षानुवर्षे हे वाडे किंवा वास्तू अजूनही टिकून आहे. शाळेतील भूगोलाच्या पुस्तकांत देखील स्थानिक पर्यावरणानुसार निवास बांधले जातात, हे आपण शिकलो. याच सूत्रानुसार जर आपण आजही प्रयत्न केला तरीही निसर्ग आपल्याला तितकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त भरभरून देतो. याची बरीच उदाहरणे आता आपल्याला भारतात पाहायला मिळतील.

निवास जर पूर्णपणे पर्यावरण पूरक असेल तर तुमचा कार्बन फूट प्रिंट देखील तितकाच कमी होतो. कमीत कमी ऊर्जा वापर, पाण्याचा पुर्नवापर, टाकाऊतून टिकाऊ यासारखे बरेच पर्याय आपल्याकडे आज उपलब्ध आहेत. वास्तविशारद तज्ज्ञ, गृहसजावट तज्ज्ञ यांच्या योग्य सल्ल्याने अशी घरे बंधू शकतो, जी दीर्घकाळ आपल्याला आसरा देतील. बंगळुरूतील विशाखा आणि करुणप्रसाद कान्वी या दांपत्यांनी ‘होमबेलाकू’ नावाचे पूर्ण ग्रीन होम तयार केले आहे. या घराच्या बांधणीसाठी मातीच्या विटांचा वापर केला आहे. भितींना प्लास्टरिंग, कृत्रिम रंग देणे टाळले आहे. संपूर्ण घरात सौर दिव्यांचा, सौर कुकर, सौर हिटर, यांचा वापर करत आहेत. यामुळे पारंपरिक उर्जास्रोतांचा कमी वापर होतो. या घरातील जैव कचरा बागेत खात म्हणून वापर केला जातो. पावसाचे पाणी साठवून घरगुती वापरात त्या पाण्याचा वापर केला जातो. पाण्याचे पुर्नवापर करून ते वॉशिंग मशीन, स्वयंपाक घर स्वच्छ करण्यासाठी, वाहने धुवण्यासाठी केला जातो. सर्व सामान्य सिमेंट, काँक्रेटच्या घर बांधणीपेक्षा १५ टक्के कमी खर्च येतो.

दुसरे घर देखील याच शहरातील आहे, पण या घराची ओळख थोडी वेगळी आहे. हे घर आहे जी. व्ही. दशार्थी यांचे. ‘कचरा मने’ अशी या घराची ओळख आहे. दशार्थी आपल्या घराला ‘स्क्रॅप होम’ असाही उल्लेख करतात. कानडी भाषेत ‘कचरा मने’ म्हणजे ‘टाकाऊ घर’. दशार्थी स्वतः एक पर्यावरण तज्ज्ञ आहे. हे घर बांधताना त्यांचा एकच मंत्र होता Reduce, ‘Reuse, Recycle and Rethink’. या घराचे वैशिष्ट्य या घरातील प्रत्येक गोष्ट ही जुन्या बाजारातून किंवा जेथे बांधकामे पाडून सुस्थितीतील असलेली काही वस्तू जसे की, वॉशबेसिन इत्यादी. या संपूर्ण घराची रचना ‘माया प्रेक्सिस’ या वास्तुविशारद कंपनीने केली. या घरातील ८० टक्के वस्तू या पुर्नवापरातील आहेत. घरातील खिडक्या, फर्निचरचे लाकूड, पायऱ्या, पुस्तकांचे रॅक हे पॅकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाच्या बॉक्सपासून केले आहेत. याशिवाय पावसाच्या पाण्याचा पुर्नवापर, सौर ऊर्जेचा वापर यंत्रणा बसविल्या आहेत. या घराच्या उभारणीसाठी फक्त सात महिन्यांचा कालावधी लागला याशिवाय घरासाठी खर्च सामान्य घराच्या उभारणी खर्चापेक्षा निम्माच आला आहे.

जी. व्ही. दशार्थी यांचे ‘कचरा मने’

यासारखीच आणखी वैविध्यपूर्ण घरे कोडाईकॅनलमध्ये ,दिल्लीतील प्रशांतो रॉय,मुंबईतील भार्गव कुटुंबीय, महाराष्ट्रातील देवगडमध्ये ठाकूरसाई गावात अ‍ॅनाबेले आणि क्लेमेंट डीसिल्वा यांनी पूर्ण दगडांच्या वापराने घर बांधले आहे. पर्यावरण पूरक घरांच्या बांधणीमध्ये आणखी एका घराचा आवर्जून उल्लेख करावा म्हणजे हरी आणि आशा यांचे केरळ मधील कन्नूर मधील घर. हे घरामध्ये विजेचा वापर अजिबात करत नाहीत. हे घर पूर्णपणे मातीचे बनले असून स्वयंपाक घरातील फ्रिज देखील मातीचा आहे. हरी यांचे घर पर्यावरण पूरक घटकांनी बनले असल्याने सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात मिळते.

हरी आणि आशा यांचे केरळ मधील कन्नूर येथील घर

आता तुम्हाला प्रश्न पडेल अशा प्रकारची घरे बांधणाऱ्या वास्तुविशारदांची माहिती तुम्हाला कुठे मिळेल? तर देशात नामांकित काही तज्ज्ञ आहेत, जे तुम्हाला या सारख्या गृह निर्माण प्रकल्पांसाठी मदत करू शकतील. त्यापैकी एक नाव म्हणजे तृप्ती दोषी.या मूळच्या नवी मुंबईच्या असून पॉंडिचेरीमध्ये कार्यरत आहेत. तिरूअन्नामलई मधील बिजू आणि सिंधू भास्कर हे दाम्पत्य ग्रामीण भागात पर्यावरण पूरक घरे उभारत आहेत. चेन्नईस्थित अभियंता बेनी कुरैकोसी
Eugene Pandala हे आणखी एक अनुभवी वास्तुविशारद आहेत. पद्मश्री पुरस्कार विजेते गोपाळ शंकर यांचा अनुभव आणि काम अतिशय मोठे आहे. गोपाळ शंकर यांनी आतापर्यंत सुमारे दहा लाख पर्यावरण पूरक बांधकामे केली आहेत. गोपाळ शंकर केवळ मोठ्या इमारतीचे नाही तर शहरातील लहान-मोठ्या मच्छीमारांचे, किरकोळ विक्रेत्यांची, भाजी विक्रेत्यांची घरे बांधूंन दिली आहेत.

गुजरातमधील भूज भागात प्रजासत्ताक दिनी झालेला प्रचंड भूकंप अजूनही सर्वांच्या मनात आहे. अशा भागात नैसर्गिक आपत्तीमध्ये कोसळलेली घर पुन्हा उभी केली ती देखील आपत्तीपासून बचाव करणारी आता उभी होत आहेत. हे शिवधनुष्य पेलत आहेत ‘हुनरशाला फाउंडेशन’. हे फाउंडेशन स्थानिक लोकांबरोबर कार्यरत आहेत.

हुनरशाला फाउंडेशन’

राजस्थानातील डुंगरपूर गावात मधुलिका आणि आशिष पांडा यांनी देखील पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या ठिकाणी रेन वोटर हार्वेस्टींग यंत्रणेचा पुरेपूर वापर करून तसेच पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने प्रशस्त घर बांधले आहे. या घरात पावासाच्या पाण्याचा एका ही थेंब वाया जाऊ देत नाहीत. या भागात पावसाचे प्रमाण लक्षात घेता घरगुती वापरापासून घरातील बागेला देखील हे पावसाचेच पाणी वापरतात. त्यांच्या घरात ४५ हजार लिटर साठवण क्षमतेच्या टाक्या असून तब्बल तीन वर्ष पाणी पुरेल इतका साठा ते करू शकतात. हे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी अगदी सामान्य फिल्टरचा ते वापर करतात. पावसाचे पाणी आणखी प्युरिफाय करण्याची गरज नसते कारण ते आधीच गोड असते, हल्ली शहरात जे महागडे वॉटर प्युरिफायर आले आहेत, त्यातून पाण्याचे प्रमाणापेक्षा जास्त प्रदूषण होते. त्यामुळे पावसाच्या पाणी आणि सौर ऊर्जा यांचा जास्तीत जास्त वापर केला तर महाराष्ट्रातील दुष्काळी भागात देखील माणसांना इतरत्र स्थलांतरीत होण्याची गरज पडणार नाही.

राजस्थानातील मधुलिका आणि आशिष पांडा यांचे घर

पुण्यातील ध्रुवंग हिंगमिरे आणि प्रियांका गुंजीकर हे दोघे स्थानिक लोकांच्या मदतीने स्थानिक बांधकाम साहित्याचा वापर करून पर्यावरण पूरक घरे उभारण्याचे काम करत आहेत. ”आम्हाला असे वाटत नाही की, आमचे डिझाईन हटके असावे पण आमचे बांधकाम जितके जास्त निसर्गाच्या जवळ जाणारे असेल तितके ते उठून दिसेल. आणि अर्थातच त्यातच वास्तुविशारदाचे खरे कौशल्य आहे, असे आम्हाला वाटते,” ध्रुवांगने असे एका मुलाखतीमध्ये सांगितले.

ध्रुवंग हिंगमिरे आणि प्रियांका गुंजीकर

मलकसिंग गिल हे देखील एक पारंपरिक पद्धतीची बांबू आणि लाकडापासून घरे बनवतात. ध्रुवंग आणि प्रियांकाचे ते आदर्श आहेत. गिल कोणत्याही प्रकारचे घर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने पण आकर्षक करतात. मग ते एका खोलीचे असो किंवा बंगला असो किंवा फार्म हाऊसची असो ते बांधकाम आकर्षक आणि पर्यावरण पूरकच असते.चेन्नईस्थित अनुपमा मोहनराम आणि जयदीप विवेकानंद यांची ग्रीन इव्होल्यूशन ही फर्म पर्यावरणपूरक घरे बनवते.बंगळुरू स्थित ‘मेड इन अर्थ’ ही कंपनी देखी जास्तीत जास्त पर्यावरण पूरक घटकांचा वापर करून व्यवसायिक इमारती आणि संकुले ,घरे उभारण्याचे काम करते.

मलकसिंग गिल

भारतात सध्या बंगळुर आणि केरळ मध्ये अशा घरांची संख्या जास्त आहे, पण जर बंगळूर मध्ये अशी घरे बांधली जाऊ शकतात तर देशातील इतर कुठल्याही भौगिलिक परिस्थिती ती बांधली जाऊ शकतात आणि तितकीच टिकाऊ देखील, असे काही वास्तुविशारदांचे मत आहे.

घर हा पर्यावरणपूरक जीवनशैलीतील एक महत्वाचा भाग झाला. पण हे सगळे वाचून यात खूप मोठे विज्ञानाचा अभ्यासक असावे लागते असे नाही तर प्राथमिक गोष्टींचा जर अभ्यास करून तुम्ही घराची रचना केलीत जसे की, तुम्ही कोणत्या भौगोलिक प्रदेशात राहता तिथे भूकंपासारख्या परिस्थिती घराची रचना कशी असावी? ऊन, वारा, पाऊस, यांची दिशा,प्रत्येक ऋतूतील तापमान, स्थानिक इतिहास हे सर्व जाणून घेऊन थोडी आकडेमोड केली तर पाणी आणि सौरऊर्जेचा पुरेपूर वापर करता येणे सहज शक्य आहे. या सर्व गोष्टी व्यावसायिक इमारती बांधताना देखील शक्य आहे, अगदी दुमजली किंवा त्यापेक्षा जास्त देखील शक्य आहे. यामध्ये संबंधित इमारती आणि घरात येणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून ते घरातून बाहेर सार्वजनिक ठिकाणी पोहोचवताना देखील कसे जास्तीत जास्त शुद्ध करून पाठवू शकतो हे देखील करणे शक्य आहे. घरातील मैल पाण्यासकट, स्वयंपाक घरातील वापराच्या पाण्यापर्यंत सर्वच गोष्टींचे नियोजन करून त्यावर छोटे किचन गार्डन किंवा बैठे घर असेल तर आजूबाजूला बाग करणेही सहज शक्य आहे. या प्राथामिक गोष्टी जरी आपण नेटाने पाळल्या तरी आपल्यावर सतत कोसळणारी नैसर्गिक संकटे आपण सहज पेलवू शकू. भविष्यात होणाऱ्या प्रदूषणाचा विस्फोट रोखू शकू.

इतर उपाय

हे झालं घराचं. या शिवाय इतर गोष्टी जसे की,सध्या आपण फक्त ऑर्गेनिक भाज्या विकत घेतो. याच बरोबर आपण प्लॅस्टिक वापर पूर्ण बंद करून मातीची भांडी वापरू शकतो, पेट्रोल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांचा, सायकलचा वापर करू शकतो. घरगुती वापरात जसे की,साबण, क्लिनींगची साधने, साबण ही देखील ऑरगॅनिक वापरू शकतो, यातून निर्माण होणारे ‘ग्रे’ वॉटर जमिनीत गेले तरी ते हानिकारक राहत नाही. आणखी एक महत्वाची गोष्ट महिलांसाठी दर महिन्याला प्लॅस्टिक सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्या ऐवजी बायोडिग्रेडेबल पॅड्स जी जमिनीत सहज जैव खात होतात ती अजमावू शकता. दुसरा पर्याय म्हणजे कापडी आणि तिसरा कप यामुळेही बरेच प्रदूषण कमी होण्यास मदत मिळते. शेती करत असल्यास जमिनीत रासायनिक खतांचा वापर टाळावा. शहरातील दुसरा मोठा प्रदूषणाचा भाग म्हणजे मोठी इलेक्ट्रॉनिक वस्तू एअर कंडिशन ज्यामुळे विजेचा अतिरिक्त वापर वाढतोच परंतु खोली बाहेरचे वातावरण ही तितकेच वाढते. कृत्रिम धाग्याची वस्त्रे वापरण्यापेक्षा सुती, कॉटन अशा कपड्यांचा वापर करावा, विनाकारण घरात पाण्याचे प्युरिफिकेशन करण्यासाठी महागडे प्युरिफायर घेऊ नये. कपडे,भांडी किंवा घरगुती क्लिनिंग साधनांसाठी ऑर्गेनिक उत्पादनांचा वापर केल्यास कमीत कमी प्रदूषित पाणी आपण बाहेर सोडू शकतो.यासारखे बरेच उपाय सध्या प्राथमिक पातळीवर जरी कमी करता आले तरी खूप मोठी सुधारणा होऊ शकते, फक्त गरज आहे इच्छा शक्तीची आणि पर्यावरण पूरक प्रकल्प सढळ हाताने राबविण्याची.

आता वेळ आली आहे सर्व मोठ्या शहरांनी गावांनी खडबडून जागे होण्याची निसर्गाने दिलेल्या हाकेला खऱ्या अर्थाने जागण्याची अजून किती दिवस आधुनिकीकरणाच्या नावाखाली आपण आपल्या मूळ राहणीमानाची निसर्गाशी जोडलेल्या संस्कृतीकडे दुर्लक्ष करणार आहोत. वृक्ष दिन, वटपौर्णिमा यासारख्या दिवशीच फक्त कर्तव्य करून हे दिवस सार्थकी नक्कीच लागणार नाहीत. आजचा पर्यावरण दिवस एक दिवसापुरता मर्यादित न राहता प्रत्येकाने तो आयुष्यभर जगावा असे निदान प्रयत्न तरी सुरू करायला हवेत. प्रगती करताना आपण इतिहासातून काही तरी शिकून पुढे जायला हवे.मानवाच्या निवासा बाबत सांगायचे झाले तर पुन्हा पूर्वजांकडून प्रेरणा घेऊन रचना करणे गरजेचे आहे. थोडक्यात गदिमांच्या गीतासारखे ”या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकड़े आपुल्या”.

अंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा