एक अनुभव

मी अमेरिकेतील मिशीगन राज्यातील वेन्स्टेट विद्यापीठात सुमारे दीड वर्षांपासून संशोधक म्हणून काम करीत आहे. सध्या अमेरिकेत कोरोना या विषाणूचा प्रसार वेगाने वाढत आहे. मिशीगन राज्यात सध्या ५० हजार रुग्ण बाधित आहेत, त्यातील ४८२५ रुग्ण मृत झालेले आहेत. संपूर्ण अमेरिकेत १४,८४,२८५ रुग्ण बाधित आहेत. त्यातील ८८,५०७ रुग्ण मृत झालेले आहेत, मात्र ३,२६,२४२रुग्ण बरे झालेले आहेत.ही माहिती दिनांक १५ मे २०२० पर्यंतची आहे.
येथे पहिला लॉकडाऊन हा २० मार्च २०२० पासून सुरू झाला. तो आता २८ मे २०२० पर्यंत वाढविण्यात आला आहे. येथे लोकसंख्या भारतापेक्षा कमी असल्याने कोणीही घराबाहेर पडत नाहीत. पडलेच तर तोंडाला मास्क लावून, हातमोजे घालून स्वत:ला सॅनीटायझर करून बाहेर पडतात. प्रत्येकजण Social distances योग्य ठेवून बाहेरील व्यवहार पूर्ण करतात.

मी संशोधक असल्यामुळे मला आमच्या प्रयोगशाळेत महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर जावे लागते. इतर वेळी मी घरून काम करीत आहे.येथे पिझ्झा व इतर पदार्थ मिळण्याची हॉटेल्स चालू आहेत. मात्र तेथे बसून पदार्थ खाण्यास बंदी आहे. पदार्थ जपश्रळपश वर बुक करून आपल्याला तेथे जाऊन पार्सल मिळू शकते, अथवा आपण आपल्या घरीही पार्सल मागवू शकतो. खाण्याचे पदार्थ घरी आणल्यानंतर ते गरम करूनच खावे लागतात. त्यामुळे निर्जंतुकीकरण होते.

मी पंधरा दिवसांतून एकदा किराणा माल, दूध, भाजीपाला व बेकरी उत्पादने विकत आणतो. दूध, भाजीपाला, किराणा माल या सर्व वस्तू एकाच दुकानात मिळतात. किराणा मालाचे दुकानात “Please wear the masks and Please maintain the necessary 6 feet distance as per covid-19 guidelines’ या आशयाची टेप सतत लावली जात असल्याने येथे येणार्‍यांच्या मनात Social distance पाळावा अशी भावना निर्माण होते. येथे वॉलमार्ट, कॉस्टको, पटेल ब्रदर्स, इंडियन ग्रॉसर्स अशा नावाची किराणाची दुकाने आहेत. किराणामालाच्या दुकानातून वस्तू आणल्या की आम्ही त्या सर्व वस्तू सॅनीटाईझ करून ठेवतो. जे पदार्थ ताबडतोब वापरावयाचे नसतात ते पदार्थ तीन दिवस उन्हातच ठेवतो, त्याला अजिबात हात लावत नाही. किराणामाल आणताना जे कपडे घालून गेलेलो असतो ते घरी आल्यावर काढून उकळत्या पाण्यात तीन तास भिजवून ठेवतो, त्यामुळे त्यातील जंतू मरून जातात. मी घरी आल्यावर नेहमी गरम पाण्याने आंघोळ करीत असतो. प्रतिकार शक्ती येण्यासाठी मी नियमित व्यायाम करतो व गरम पाणी पित असतो.सकाळच्या वेळी शुद्धा हवा असल्याने अमेरिकेतील लोक मॉर्निंग वॉकला जातात; पण रस्त्यावर अजिबात गर्दी करीत नाहीत. ते सोशल डिस्टन्स ठेवून आपल्या कुत्र्यालासुद्धा फिरायला नेतात. ते जाताना तोंडाला मास्क लावून जातात. सॅनिटायझर करतात व हातमोजेही घालतात.

कोरोना नावाची नैसर्गिक आपत्ती आली आहे. तिचेवर मात करण्याकरिता अमेरिकेतील प्रत्येक नागरिकाच्या बँकेच्या खात्यात (ज्यांचेकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे अशांना)-१२०० (डॉलर) एवढी रक्क्कम जमा करण्यात आलेली आहे. यामुळे अमेरिकेतील प्रत्येक माणसाची काळजी सरकार घेत आहे, हे दिसून येते.
लॉकडाऊनच्या काळात अमेरिकेतील बर्‍याच तरुणांना नोकरीवर काढून टाकलेले आहे. ते बेकार झालेले आहेत. त्यामुळे येथील लॉकडाऊन लवकरात लवकर संपुष्टात आणावा यासाठी तरुण लोक तीव्र आंदोलने करीत आहेत.

मी माझ्या तब्येतीची काळजी घेत आहे. मी माझ्या आईवडिलांना तसेच इतर नातेवाईकांना/मित्रांना रोज रात्री किंवा सकाळी (माझ्या वेळेनुसार) व्हिडीओ कॉल करतो त्यामुळे एकमेकांची ख्याली खुशाली कळते. मी सर्वांना आवर्जुन सांगतो की, तुम्ही सर्वजण घरीच राहा आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्या.

अमेरिकेत सध्या सुमारे १५,००,००० रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील ९०,००० रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत याचा अर्थ मृत्यूचे प्रमाण फक्त ६ टक्के एवढेच आहे. म्हणजेच ९४ टक्के लोक या मोठ्या महामारीतून वाचत आहेत. त्यामुळे या महामारीकडे सकारात्मकदृष्ट्या बघणे गरजेचे आहे. प्रत्येकाने कोरोनाला सामोरे जाण्यासाठी सकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी अंगीकारणे आवश्यक आहे. हे मला या लेखात सुरु करावयाचे आहे. कोणतेही महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा. अन्यथा आपल्या घरीच रहा.माझ्या भारतातील वाचकांनो मी आपणास नम्र विनंती करतो की, आपण कारणाव्यतिरिक्त बाहेर पडू नका घरी राहा. स्वस्थ रहा.

डॉ. समीर जोशी
डेड्रॉईट, मिशीगन,अमेरिका

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा