बुधवारपेठेतून ७० टक्के महिलांचे स्थलांतर

पुणे : कोरोना विषाणूचे सावट दूर होत असताना दुसरीकडे ज्यांना आर्थिक फटका बसला त्यांची आता जगण्यासाठीची परवड सुरू झाली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी देहविक्री करणार्‍या महिलांवर गाव, परिसर सोडून जाण्याची वेळ आली आहे. बुधवार पेठ येथील कुंटखाण्यातील जवळपास 50 टक्के महिलांनी स्थलांतर केले आहे.

पुण्यात देहविक्री करणार्‍या महिलांची बुधवार पेठेमध्ये सर्वात मोठी वस्ती आहे. या वस्तीमध्ये कर्नाटक, आंध्रप्रदेश, चेन्नई, ओडीसा, अशा विविध ठिकाणच्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, जगावर पडलेल्या कोरोना विषाणूचे संकट या वस्तीतील महिलांवर आभाळ कोसळल्यासारखे वाटत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘सोशल डिस्टंसिंग’ हाच पहिला आणि?शेवटचा प्रतिबंधात्मक उपाय असल्याने या उपायाचा फटका या महिलांना बसला आहे.
रोग होऊ नये म्हणून स्वयंप्रेरणेतून आदेशाची अंमलबजावणी पाळली जात आहे. योग्य ती काळजी घेतली जात असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. वस्तीतील त्रोटक जागा आणि त्यात असणार्‍या महिलांची संख्या पाहता सोशल डिस्टंसिंग केवळ नावालाच पाळले जात असल्याचे लक्षात घेता, अनेक महिलांनी मायदेशी परतण्याचा मार्ग स्वीकारला. परंतु, जिल्ह्याच्या सीमा बंद असल्याने त्यांच्या या मार्गावरदेखील अडचणी आल्याने या महिलांनी आहे त्या जागेतच तिसर्‍या लॉकडाऊनपर्यंत कसेबसे दिवस काढले. परंतु, आर्थिक स्रोतच बंद झाल्याने अन्नासाठी ताटकळत बसावे लागल्याची शोकांतिका या परिसरातील एका महिलेने सांगितले.

मधल्या काळात बहुतांश स्वयंसेवी, सेवाभावी संस्थांनी फूड पॅकेट, दररोज जेवण आणून दिले. परंतु, आता जिल्हा प्रशासनाने पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्व परिसर खुला केला आणि प्रतिबंधित क्षेत्रातील लॉक डाऊनचे नियम कठोर करण्यास सुरवात केल्याने आमच्या उपासमारीला पुन्हा सुरवात झाली असल्याचे या महिलेने सांगितले.

जवळ असलेल्या पैशात आत्तापर्यंतचा खर्च भागला. परंतु, मागील आठ दिवसांपासून पैसे नसल्याने अनेक महिलांनी आळीपाळीने जेवण करून दिवस काढण्यास सुरवात केली. त्यातच मानसिक, शारिरीक आजार होण्याची भीती बळावल्याने बहुतांश महिलांनी शुक्रवारपासून दुसर्‍या परिसरात स्थलांतर करण्यास सुरवात केली आहे. तर काहींनी आपले गाव गाठण्यासाठी रेल्वे स्टेशन गाठले?आहे. या वस्तीत जवळपास 7 ते 8 हजार पेक्षा जास्त महिला देहविक्रीचा व्यवसाय करत असताना सद्य:स्थितीला केवळ 300 ते 400 महिला वस्तीत राहत असल्याचे महिलेने सांगितले.

कोरोनापेक्षा ‘स्थलांतर’ हाच मोठा धोका…

एखाद्या नवीन परिसरात देहविक्री करणारी महिला आल्याचे समजताच संबंधित परिसरातील, समाजातील नागरिक तुच्छ नजरेने पाहण्यास सुरवात करतात. परंतु, आमच्या परिसरात राहायचे नाही, दररोजची भांडणे-तंटा असे अनेक अनुभव आले आहेत. एकीकडे नागरिकांचा, तर दुसरीकडे पोलिसांचा दबाव पाहता देहविक्री झालीच नाही तर पैसे मिळणार कुठून. त्यात देहविक्री न करता इतर व्यवसाय करण्यास सुरवात करण्याची तयारी दर्शवली तरी समाजाची मानसिकता पुन्हा त्याच क्षेत्रात टाकण्यासाठी परावृत्त करते, असे या महिलेने सांगत कोरोनापेक्षा स्थलांतर हा आमच्या क्षेत्रातील महिलांसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे यावेळी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा