चंद्रकांत पाटील यांच्या विधानाने खळबळ

प्रकाश भोईटे

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होणार असून, भाजप कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना केले आहे. मात्र कोणत्या कारणास्तव ही पोटनिवडणूक होणार, याचे कारण स्पष्ट न केल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले आहे.

एक वर्षापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांचा 1 लाख 55 हजार 774 मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत सुळे यांना 6 लाख 86 हजार 714, तर कुल यांना 5 लाख 30 हजार 240 असे मतदान झाले होते. दोन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी राज्यातील कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 350 कार्यकर्त्यांचा देखील सहभाग होता. त्यांना मार्गदर्शन करताना पाटील यांनी कार्यकर्त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघात पोट निवडणूक होण्याचे सूतोवाच दिले. यासंदर्भात जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पोटनिवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश दिले असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच याच बैठकीत आमदार कुल यांनादेखील पोटनिवडणुकीच्या तयारीला लागा, अशी सूचना केली आहे.

दरम्यान, याबाबत आमदार कुल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताबाबत दुजोरा दिला आहे. तसेच मला कामाला लागण्याच्या सूचना पाटील यांनी केल्याचे सांगितले. मात्र, बारामती लोकसभा मतदारसंघाची लवकरच पोटनिवडणूक होणार असल्याची चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. मात्र, ही पोटनिवडणूक कोणत्या कारणास्तव होणार आहे ? हे स्पष्ट होऊ शकले नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करून भाजपच्या तोंडचा घास पळवला. त्यावरून आजही सत्तेचे स्वप्न पाहणार्‍या भाजप नेत्यांना आपल्या हातून सत्ता गेली, हे रुचलेले नाही. त्यामुळे पवार यांना बारामतीतच खिंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना पोटनिवडणुकीच्या कामाला लागा, असा संदेश देऊन बारामतीकरांमध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा