पुणे : महापालिकेचे क्षेत्र हे रेड झोनमध्ये असले, तरी प्रतिबंधित क्षेत्र वगळून अन्य ठिकाणी असलेल्या माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) उद्योग क्षेत्रातील कंपन्यांना 50 टक्के कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत कंपन्या सुरू करण्यास प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. ’आयटी’ कंपन्या सुरू करण्यासाठी उद्योग विभागाकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठवण्याची आवश्यकता नसल्याने या कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणचे उद्योग सुरू झाले आहेत; तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील उद्योग सुरू करण्यात आले आहेत. पुणे महापालिकेच्या हद्दीत फक्त अत्यावश्यक सेवा असलेल्या उद्योगांनाच परवानगी देण्यात आली आहे. आता प्रतिबंधित क्षेत्र वगळून अन्य ठिकाणी असलेल्या आयटी क्षेत्रातील कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र एकूण कर्मचार्‍यांपैकी 50 टक्के कर्मचारी उपस्थित असतील, याची खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे म्हणाले, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेप्रमाणे पुणे महापालिकेच्या हद्दीतील ’आयटी’ कंपन्या सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या कंपन्या सुरू करण्यासाठी परवानगीचे प्रस्ताव पाठवण्याचे आवश्यकता नाही. मात्र, या कंपन्यांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक कर्मचारी कार्यालयांमध्ये उपस्थित राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी. सुरक्षित वावर राहील याचीही दक्षता संबंधित कंपन्यांना घ्यावी लागणार आहेे.

पुण्यात सुमारे 450 मोठे आयटी युनिट आहेत. लहान आयटी युनिटची संख्या सुमारे 1400 आहे. या क्षेत्रात सुमारे साडेचार लाख कर्मचारी काम करतात. हिंजवडी आयटी पार्कमध्ये 146 युनिट आहेत. पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी 72 आयटी पार्क आहेत, असे सुरवसे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्यात सुमारे 14 हजार मोठे उद्योग, तर सुमारे चार लाखांपेक्षा अधिक लघु, मध्यम उद्योग आहेत. पुणे जिल्ह्यातील विविध उद्योगांची संख्या 2 लाख 34 हजार 677 असून, सुमारे साडेसोळा लाख कामगार काम करतात. त्यापैकी सुमारे साडेचार लाख कर्मचारी हे आयटी क्षेत्रामध्ये आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा