पुणे : सर्वसामान्यांची वाहतूक वाहिनी असलेली लालपरी प्रवाशांच्या वाहतुकीसाठी शुक्रवारी सज्ज झाली. जिल्ह्यात दिवसभरात 56 बसचे नियोजन करण्यात आले होते. मात्र प्रवासी उपलब्ध नसल्याने केवळ 18 बस धावल्या. या बसमधूनही मोजक्याच प्रवाशांनी प्रवास केला. नियोजित 38 बस प्रवाशांअभावी धावू शकल्या नाहीत. जिल्ह्यातील बारामती, इंदापूरसह अन्य आगारातून बस धावल्या. पुणे शहर लाल भागात असल्याने स्वारगेट, वाकडेवाडी आणि पुणे स्टेशन बस स्थानकातून एकही बस धावली नसल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले.

लाल भाग वगळता हिरव्या भागातून बस सेवा सुरू करण्याची मुभा शासनाने दिली आहे. त्यानुसार काल पुणे विभागातूनही बस धावल्या. विविध मार्गावर 56 बसचे नियोजन करण्यात आले होते. पुणे विभागात स्वारगेट, वाकडेवाडी, पुणे स्टेशन, चिंचवड, भोर, तळेगाव, राजगुरूनगर, नारायणगाव, सासवड, बारामती, बारामती एमआयडीसी, इंदापूर, शिरूर, दौंड असे 13 आगार आहेत. 13 पैकी शहरातील स्वारगेट, वाकडेवाडी, पुणे स्टेशन आणि चिंचवड आदी आगार लाल विभागात आहेत. तर उर्वरित आगार हिरव्या भागात आहेत. त्यामुळे लाल भागातील आगार वगळता इतर आगारातून बस सोडण्याचे नियोजन एसटी प्रशासनातर्फे करण्यात आले होते. मात्र बस सुरू झाल्याचा पहिल्याच दिवस असल्याने प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला.

विभागातील बस धावण्याचा पहिलाच दिवस होता. कोरानामुळे घराबाहेर पडताना नागरिक विचार करीत आहेत. त्यामुळे बस सुरू झाली असली, तरी प्रवाशांचा प्रतिसाद मात्र अत्यल्प आहे. आणखी काही दिवस नागरिक प्रवासासाठी घराबाहेर पडणार नसल्याने बस स्थानकात अधिक गर्दी होणार नाही. पुढच्या आठवड्यापासून मात्र प्रवासी संख्या वाढू शकते. असा अंदाज एसटी प्रशासनाने व्यक्त केला.

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहर लाल भागात आहेत. त्यामुळे शहरातील आगार वगळता जिल्ह्यातील बहुतांश आगारातून प्रवाशांच्या मागणीनुसार बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. बस सोडताना अंतर ठेवणे, खबरदारी घेण्याचे आवाहन प्रवाशांना करण्यात आले होते. येत्या काळात शासन आणि प्रशासनांच्या सूचनांचे पालन करून बस सोडण्याचे नियोजन केले जाणार आहे.

यामिनी जोशी, वाहतूक नियंत्रक, पुणे विभाग.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा