पुणे : मागील आठवड्यात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले होते. त्याचाच परिणाम म्हणून नियोजित वेळेच्या चार दिवस आधी (१७ मे) मान्सून दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटावर दाखल झाला होता. मागील पाच दिवसांपासून मान्सून तेथेच रेंगाळला आहे. अद्याप मान्सूनचा पुढचा प्रवास सुरू झाला नसल्याचे शुक्रवारी हवामान विभागाने सांगितले.

बंगालच्या उपसागरात मागील शनिवारी (१६ मे) निर्माण झालेल्या अम्फन चक्रीवादळ दोन दिवसांपूर्वीच पूर्व किनारपट्टीवर धडकले. या वादळाचा मान्सूनच्या पुढील वाटचालीवर काही अंशता परिणाम झाला आहे. काल मान्सून बहुतांश अंदमान आणि निकोबार बेटावर व्यापण्याची शक्यता होती. मात्र तो अद्यापही दक्षिण अंदमानातच रेंगाळला आहे. मान्सूनच्या पुढील प्रवासाला आणखी विलंब झाल्यास केरळातील अगमनही लांबण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास मान्सूनचे राज्यातील अगमनही लांबणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

पुण्यासह राज्यात पावसाची विश्रांती

राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले होते. त्यामुळे ठिकठिकाणी पाऊस पडत होता. मात्र मागील चार दिवसांपासून पुण्यासह राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. आकाश नीरभ्र असल्याने कमाल आणि किमान तपमानात लक्षणीय वाढ झाली आहे. सर्वत्र ऊन वाढल्याने उकाडाही वाढला आहे. येत्या मंगळवारपर्यंत राज्यात कोरडे हवामान असणार आहे. पुण्यात मात्र सोमवारपासून अंशत: ढगाळ वातावरण असणार आहे. तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात नागपूर येथे 44.5 अंश उच्चांकी तपमानाची नोंद झाली. पुण्यात काल 38 अंश कमाल, तर 23.8 अंश किमान तपमानाची नोंद झाली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा