पुणे : भुसार बाजारात मागील आठवड्यात व्यापारी आणि कामगारांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून मागील मंगळवारपासून बाजार बंद ठेवण्याचा निर्णय व्यापार्‍यांनी घेतला होता. मात्र नागरिकांची अन्नधान्याची गैरसोय टाळण्यासाठी बाजार समिती प्रशासन आणि जिल्हाधिकार्‍यांनी योग्य ती खबरदारी घेवून पुन्हा बाजार सुरू करण्याच्या सुचना व्यापार्‍यांना दिल्या आहेत. त्यानुसार येत्या सोमवारपासून बाजार सुरू होणार असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी शुक्रवारी दिली.

देशमुख म्हणाले, भुसार विभागाचे निर्जंतूकीकरण करण्यात आले आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे. तसेच बाजार सुरू झाल्यानंतर वाहनांची तसेच खरेदीदारांनी गर्दी टाळण्यासाठीही नियोजन करण्यात आले आहे. भुसार मालाची दुकाने सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत उघडी असणार आहेत. सुकामेवा व पुरक दुकाने सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत उघडण्यात येतील. शेतीमालाची आवक बंद असणार आहे. बाजारात रोज 100 वाहनांनाच परवानगी दिली जाणार आहे. गेट क्रमांक पाचमधून वाहनांना प्रवेश दिला जाईल. बाहेर जाणार्‍या वाहनांना इतर गेटचा वापर करता येणार आहे. बाधित क्षेत्रातील खरेदीदार आणि कामगारांना बाजारात प्रवेश बंदी असणार आहे. दुकानदारांनी बाधित क्षेत्रातील कामगारांना दुकानात घेतल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचेही देशमुख यांनी नमुद केले.

व्यापारी, हमाल, खरेदीदारांना मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. ग्राहकांत 3 ते 4 फुटांचे अंतर ठेवणे, सॅनिटाटझरचा वापर करण्याच्या सुचना व्यापार्‍यांना देण्यात आल्या आहेत. बाजारात धान्याच्या कीट तयार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. आवक झालेली वाहने सायंकाळी 5 पर्यंत खाली करून घ्यावी लागणार आहेत. 6 नंतर बाजारात थांबण्यासही बंदी घालण्यात आली आहे. तसेच शहरातील बाधित क्षेत्रातील नागरिकांना बाजारात बंदी असणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

मार्केटयार्डातील इतर विभाग सुरू होणार?

मार्केटयार्डातील तरकारी, फळे, कांदा-बटाटा, केळी, फुले आणि पान विभाग सुमारे दीड महिन्यापासून बंद आहे. हे विभाग सुरू करण्यासाठी बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख यांनी आडते, हमाल, कामगार, टेम्पो चालकांची मंगळवारी बैठक बोलविली आहे. या बैठकीत बाजारातील बंद विभाग सुरू करण्यासह खबरदारी व उपाय-योजनाबाबत चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे लवकरच मार्केटयार्डातील बंद असलेले विभागही सुरू होणार असल्याचे संकेत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा