विजय चव्हाण

पुणे : देशात शंभर वर्षांपूर्वी प्लेगची मोठी साथ आली होती. ऑक्टोबर १८९६ मध्ये प्लेगचा पहिला रुग्ण आढळला होता. जगभर पसरलेल्या कोरोनाप्रमाणेच प्लेगची साथ चीनमधून भारतात आल्याची नोंद आहे. या काळात देशात दुष्काळ होता. चीनमधील हाँगकाँग शहरातून मुंबईच्या बंदरात अन्न-धान्याची पोती आली. याबरोबरच उंदीरही आले आणि पाहता पाहता प्लेगची साथ मुंबईत पसरली. मुंबईहून प्लेग पुण्यात आला आणि पुढे राज्यभर पसरला.

१८९६-९७ मध्ये दुष्काळाबरोबच प्लेगने धुमाकूळ घातला होता. तेव्हा सुरुवातीच्या काळात लोकमान्य टिळकांनी सरकारी उपायांना विरोध केला नाही. मोठ्या प्रमाणात प्राण वाचवायची जबाबदारी पडल्यानंतर सरकारकडून काही प्रमाणात सक्ती झाली. ती समजावून घेऊन जनतेने सरकारशी सहकार्य करायला शिकले पाहिजे, असा विचार त्यांनी आपल्या प्लेगविषयीच्या सुरुवातीच्या अग्रलेखांमधून मांडला. दुष्काळामध्ये टिळक गावोगावी जात असतानाच प्लेगच्या साथीने मुंबईत थैमान घातले. मुंबईकरांना दुष्काळाचा मोठा फटका प्रारंभी बसला नाही; पण प्लेगचा धुमाकूळ सुरु झाला आणि स्मशानात मृतदेहांचे ढीग लागले. संपूर्ण राज्यात प्लेग पसरला. कोणताही असा भाग राहिला नाही की, जिथे प्लेगचा प्रादुर्भाव झाला नाही.

तुंबलेली गटारे, घाणीचे साम्राज्य, अस्वच्छतेचा कळस आणि नासक्या, कुजक्या धान्यांनी भरलेली कोठारे आणि त्यावर उंदरांचे साम्राज्य यातून भीषण परिस्थिती निर्माण झाली. पुण्यात १८९६ च्या ऑक्टोबर महिन्यात प्लेगचा पहिला रुग्ण सापडला. त्याविषयी ‘केसरी’त म्हटले होते की, ‘मुंबईहून येथे आलेल्या एक-दोन जणांपुरता मर्यादित असणारा प्लेग पाहता पाहता पसरला.’ ज्या प्रमाणे आता कोरोनाची साथ संपूर्ण देशात थैमान घालत आहे, अशीच परिस्थिती त्याकाळात सुध्दा होती. सरकारी कार्यालये आणि मुंबईमधील न्यायालयेदेखील बंद झाली. मुंबईतून गुजरातकडे नागरिकांचे लोंढे जाऊ लागले. मुंबईहून पुण्यात येणार्‍यांवर नजर ठेवण्यात येऊ लागली; पण चुकवून मुंबईकर पुण्यात आले. स्टेशनजवळील परिसरात रविवार पेठ, भाजी आळी, लोणार आळी, कसबा या भागात प्लेगचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले. पुण्यातील प्लेगची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रँड नावाच्या अधिकार्‍याची नेमणूक करण्यात आली.

४ फेब्रुवारी १८९७ रोजी एक कायदा संमत करुन सरकारने लष्करी अधिकार घेतले. याकाळात प्लेगला प्रत्येकाने आपले दरवाजे बंद करावेत आणि प्लेगच्या रुग्णांना इस्पितळात पाठवावे, त्यांना घरी ठेवून घेऊ नये असे कळकळीचे आवाहन ‘केसरी’ने केले. सरकारने क्वारंटाइन कक्ष निर्माण केले, पण तिथे खाण्या-पिण्याच्या व्यवस्था ठेवल्या नाहीत. शहरापासून प्लेगच्या रुग्णांना बाजूला ठेवायचा कटाक्षाने प्रयत्न केला. त्याचा परिणाम जो रुग्ण प्लेगने जाणार होता, तो उपासमारीने आणि प्रतिकारशक्ती संपल्याने मान टाकू लागला. त्याचा परिणाम असा झाला की, घराच्या रुग्णांला सरकारच्या हवाली म्हणजे इस्पितळाच्या हवाली करायला नागरिकच बिचकू लागले. नकार देऊ लागले. सरकारी रुग्णालयात रवानगी म्हणजे मृत्यू पत्करणे होय, असाच बहुतेकांचा समज बनला. टिळकांनी पुण्यातल्या डॉक्टरांना एकत्र करुन म्युनिसिपालटीकडे कामासाठी पाठवून दिले.

प्लेगच्या उपाययोजनांच्या नावाखाली नागरिकांचा प्रचंड छळ होऊ लागला. भलतीच माणसे घेऊन जाऊन त्यांना क्वारंटाइन केले जाऊ लागले. लोकांच्या पश्चात त्यांच्या घरात शिरुन त्यांच्या मालाची नासाडी करणे, म्हातारी-कोतारी यांना रुग्णालयात टाकणे, महिलांवर अत्याचाराचे प्रकार वाढले. अधिकारी रॅण्ड यांच्याकडे तक्रार करुन सुध्दा कोणतीच दखल घेण्यात आली नाही, असे ‘केसरी’ने नमूद केले होते. याचा परिणाम नागरिकांमध्ये चीड निर्माण झाली. यामधून चाफेकर बंधूंनी २२ जून १८९७ ला रँड याची हत्या केली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा