पुणे : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ऐतिहासिक आणि वैभवशाली परंपरा असलेला गणेशोत्सव यंदा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय मानाच्या व प्रतिष्ठित गणपती मंडळांनी घेतला आहे.

मानाच्या गणपतीसह प्रतिष्ठित गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांची आगामी उत्सवासंदर्भात ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीत यंदाचा उत्सव पारंपरिक पण साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. धार्मिक कार्यक्रमांव्यतिरिक्त इतर सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्याचवेळी भक्तांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्याचाही निर्णय एकमताने घेण्यात आला.

गणेशोत्सवाचे नियोजन, तसेच बाप्पांच्या मिरवणुकीच्या निर्णयाबाबत तत्कालीन परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने शासन आणि प्रशासनाला सहकार्य करणे; सर्व अटी, नियम व शर्तींचे काटेकोर पालन करणे, शहरातील सर्व गणेश मंडळांच्या विश्वस्तांची बैठक घेऊन त्यांनाही सहभागी करून घेणे आदी विषयावर या बैठकीत चर्चा झाली.

या बैठकीला कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, सौरभ धोकटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, प्रसाद कुलकर्णी, सौरभ धडफळे, केशव नेऊरगांवकर, अनिरुद्ध गाडगीळ, गुरूजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी, राजू परदेशी, पृथ्वीराज परदेशी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, नितीन पंडित, विकास पवार, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, उत्सव प्रमुख पुनीत बालन, अखिल मंडई मंडळाचे खजिनदार संजय मते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी उपस्थित होते.

मूर्तीला मास्क न लावण्याचे आवाहन

या बैठकीत आगामी उत्सवाच्या स्वरूपाविषयी चर्चा झाली. सर्व मंडळांना, नागरिक, मूर्तिकार आणि इतर सार्वजानिक गणेशोत्सव मंडळांना ‘श्रीं’च्या मूर्तीला कोणत्याही प्रकारचे मास्क न बांधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शंभर वर्षांपूर्वी प्लेगच्या साथीमुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा झाला होता. पुन्हा एकदा तशीच परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे परंपरेला साजेसा गणेशोत्सव यंदा साजरा केला जाणार आहे.

अशोक गोडसे, अध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा