पुस्तके, औषधांची दुकानेही उघडणार

पुणे : लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपताच काही प्रमाणात रेल्वे गाड्या सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकावर येणार्‍या प्रवाशांच्या सुविधेसाठी स्थानकावरील काही स्टॉल उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता खाद्यपदार्थ आणि पुस्तकांचे स्टॉल, औषधांची दुकाने उघडणार आहेत.

सद्य:स्थितीत पुण्यासह विविध शहरातून परराज्यातील मजुरांना विशेष रेल्वे गाड्याने पाठविले जात आहे. प्रवास करणार्‍या मजुरांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या कमर्शियल विभागाने रेल्वे स्थानकातील काही स्टॉल उघडण्यास परवानगी दिली आहे. त्याबाबतचे पत्र रेल्वेच्या सर्व विभागाला पाठविण्यात आले आहेत. पत्रात रेल्वे स्थानकातील खाद्यपदार्थांचे स्टॉल, पुस्तकांचे स्टॉल, औषधी स्टॉल उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र रेल्वे स्थानकातील हॉटेल्स उघडतील, मात्र तेथे बसून खाद्यपदार्थ खाता येणार नाहीत. तेथून प्रवाशांना खाद्यपदार्थांचे पार्सल घ्यावे लागेल. लॉकडाऊनचा रेल्वेलाही प्रचंड मोठा आर्थिक फटका बसला आहे. सुमारे दोन महिन्यांपासून प्रवासी गाड्या बंद आहेत. तसेच रेल्वे स्थानकेही बंद आहेत. केवळ मालगाड्यातून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली जात आहे. तसेच ठिकठिकाणी अडकलेल्या प्रवाशांसाठी श्रमिक गाड्या सोडल्या जात आहेत. मात्र १ जूनपासून पुण्यातून एक गाडी सुरू होत आहे. स्थानकातून प्रवाशांची ये-जा होणार आहे. त्यामुळेच रेल्वे स्थानकावरील स्टॉल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

पुणे-पटणा एक्स्प्रेस धावणार

येत्या १ जूनपासून २०० गाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. मात्र या २०० गाड्यांत पुण्यातून धावणार्‍या केवळ पुणे-पटणा एक्स्प्रेस या एकाच गाडीचा समावेश आहे. रेल्वे प्रशासनाकडून लवकरच या गाडीच्या आगाऊ आरक्षणाची तारीख जाहीर केली जाणार आहे. ही गाडी सुरू होणार असल्याने पुणे आणि परिसरात अडकलेल्या बिहारमधील कामगारांना त्यांच्या गावी परतण्यास मदत होणार आहे. धावणार्‍या गाड्यांच्या संख्येत वाढ झाल्यास आणखी काही गाड्या पुण्यातून धावू शकतील.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा