पुणे : महापालिकेच्या 48 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 5 जणांचा मृत्यू झाला. याच बरोबर शहर पोलिस दलातील 22 कर्मचारी बाधित झाले असून त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे शहरातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये कोरोना विरोधातील यश अपयशावरून आरोप प्रत्यारोप सुरू असताना प्रशासनाची कोरोना विरोधातील लढाईची धार बोथट केली जात असल्याने पालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रत्यक्षात रस्त्यावर काम करणार्‍या पोलिसांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. देशात जानेवारी महिन्यांत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याचा शहरातील एकमेव संसर्गजन्य आजारावरील उपचाराचे रुग्णालय असलेल्या नायडू हॉस्पीटलमध्ये सर्व यंत्रणा अलर्ट करण्यात आली. यानंतर मार्चमध्ये कोरोना बाधित आढळले त्या ठिकाणच्या तीन कि.मी. परिसरातील नागरिकांचे सर्वेक्षण आणि माहिती गोळा करण्याचे काम शिक्षक आणि परिचारीकांना देण्यात आले.

राज्यात रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर राज्य शासनाने हळूहळू सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यासोबतच संचारबंदी लागू केली. 25 मार्चला तर संपुर्ण देशातच लॉकडाउन करण्यात आले. यानंतरही शासन आदेशानुसार कार्यालयातील पाच टक्के उपस्थिती वगळता शहरातील स्वच्छता, आरोग्य, कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, अग्निशामक दल, हॉस्पीटल्स अशा प्रत्येक ठिकाणची यंत्रणा पुर्णत: रस्त्यावर उतरविण्यात आली आहे. तर लॉकडाउन आणि संचारबंदीचे काटेकोर पालन व्हावे आणि संसर्ग वाढू नये यासाठी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यासाठी पोलिसही नाकाबंदीसाठी अहोरात्र रस्त्यावर उभे ठाकले आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा