पिंपरी : संपूर्ण महाराष्ट्र आणि पिंपरी चिंचवड शहर कोरोनामुळे अडचणीत आलेले असताना आपले मानधन मुख्यमंत्री निधीला देण्याऐवजी पंतप्रधान निधीला देऊन भारतीय जनता पक्षाने येथील नागरिकांशी द्रोह केला आहे. त्यामुळेच भाजपने राज्य शासनाविरोधात आंदोलन करण्याचा अधिकार गमावला आहे. यापुढे महाराष्ट्रातील सुज्ञ जनता भाजपला जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर गुरुवारी केली.

भाजपने महाराष्ट्र बचाव आंदोलन हाती घेत विद्यमान आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर कडक टीका केली.

या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, प्रशांत शितोळे, जावेद शेख, पंकज भालेकर, सुलक्षणा शिलवंत, युवकचे अध्यक्ष विशाल वाकडकर, सुनील गव्हाणे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना वाघेरे म्हणाले, भाजपाने जे आंदोलन हाती घेतले आहे तेच मुळात हास्यास्पद आहे. संपूर्ण राज्य करोनामुळे हैराण आहे. महाविकास आघाडीच्या सरकारकडून करोना आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह मंत्रीमंडळातील सर्व मंत्री करोना आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.राज्यातील आरोग्य, वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले लाखो कर्मचारी अहोरात्र मेहनत करीत आहेत. मात्र भाजपाच्या नेत्यांना यामध्येही राजकारण सुचते ही बाब दुर्देवी आहे. राज्य आर्थिक अडचणीत असतानाही भाजप नगरसेवक, आमदार राज्याशी द्रोह करून पंतप्रधान निधीला येथील जनतेच्या पैशातून मिळालेले मानधन देत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा