सोलापूर : कोरोनाचे संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. सोलापूर शहरात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. ग्णांचे हाल होत असल्याची माहिती समोर येत आहे. सक्षम पालकमंत्री नसल्यामुळे येथील प्रशासनामध्ये सुसूत्रता नाही. खासगी रुग्णालय मोठ्या प्रमाणात ताब्यात घेण्याची गरज आहे. याशिवाय शेतकऱ्यांचेही प्रचंड हाल सुरू आहेत. राज्यशासनाने आता तरी जागे होऊन ही सर्व परिस्थिती थांबवावी. हे भाजपचे सरकारच्या विरोधात नाही तर सूचनात्मक आंदोलन आहे, असे आमदार सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे.

कोरोनाचे संकट रोखण्यात राज्यातील ठाकरे सरकारला अपयश आल्याचा ठपका ठेवत भाजपने शुक्रवारी सकाळी आमदार सुभाष देशमुख यांच्या संपर्क कार्यालयासमोर आंदोलन केले. आमदार देशमुख यांच्यासह भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी अंगणात उभे राहून, मास्क लावून काळ्या फिती, रिबन लावून, काळे झेंडे उंचावून, काळे फलक हातात घेऊन ठाकरे सरकारचा निषेध नोंदवला.या आंदोलनात आमदार सुभाष देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, उपमहापौर राजेश काळे, युवा नेते मनीष देशमुख, राज्य शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

आमदार देशमुख म्हणाले की, सोलापूर जिल्ह्याला सहा महिन्यात तीन पालकमंत्री मिळाले हे दुर्दैव आहे. एका पालकमंत्र्यांनी आदेश काढला की, तो पारित व्हायच्या आत दुसरा पालकमंत्री येतो. दुसऱ्याने केवळ एक बैठक घेत सूचना दिल्या की लगेच तिसरे पालकमंत्री आले.यासारखे दुर्दैव कोणतेही नाही. सध्या सोलापुरात कोरोनाग्रस्त रुग्ण वाढत आहेत. त्यांना योग्य त्या सुविधा मिळत नाहीत. लवकरात लवकर खासगी रूग्णालय ताब्यात घेणे आवश्‍यक आहे. मात्र या सर्व प्रक्रिया पालकमंत्री जागेवर असल्या तरच तातडीने होतात. सक्षम पालकमंत्री नसल्यामुळे प्रशासनात सुसूत्रता नाही, ते पुरते हतबल झालेले आहे. रुग्णांना योग्य सुविधा नाहीत, डॉक्टरांना आणि आरोग्य सेवकांना संरक्षण साहित्य नाही. प्रतिबंधक क्षेत्रात मास्कचे वाटप नाही, गरीब, गरजू लोकांना आज अन्न मिळेनासे झाले आहे. हे सर्व पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र असे असताना आज हे सर्व संस्था संघटना आणि दानशूर व्यक्ती करत आहेत. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. याशिवाय शेतकऱ्यांचीही प्रचंड हाल होत आहेत. पावसाळा तोंडावर आला असतानाही त्यांना खते आणि बियाणे मिळाले नाहीत. त्यांचा माल पडून आहे त्याच्या विक्रीची व्यवस्था करण्याची नितांत आवश्यकता आहे. या सर्व बाबींकडे राज्य सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. हे भाजपचे सरकारच्या विरोधात आंदोलन नसून सूचनात्मक आंदोलन आहे,असेही आमदार देशमुख म्हणाले.

यावेळी सोमनाथ केंगनाळकार, शिवराज सरतापे, महेश देवकर,आनंद बिराजदार, दैदिप्य वडापूरकार, जगन्नाथ गायकवाड आदी उपस्थित होते.भाजपचे खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीसुद्धा महाविकास आघाडी सरकारच्या विरोधातील आंदोलनात सहभागी घेतला.

शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे,प्रताप चव्हाण,महेश धाराशिवकर,आशुतोष बरडे आदींनी भगवा फडकवून तर सोलापूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष भारत जाधव,कार्याध्यक्ष संतोष पवार आणि महिला अध्यक्ष सुनीता रोटे यांनी राष्ट्रवादी कार्यालयासमोर आंदोलन करत महाविकास आघाडीला आपला पाठिंबा दर्शवला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा