आणखी सात जणांचा मृत्यू

पुणे : पुण्यात गुरुवारी पुन्हा 208 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मृत्यूंची संख्या 227 वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

कोरोनाबाधित रूग्ण कोरोनामुक्त होण्याची संख्यादेखील वाढत आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळत आहे. गुरुवारी दिवसभरात 159 जण बरे होऊन घरी परतले आहेत. शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आजपर्यंत 4 हजार 107 इतकी झाली असली तरी, यापैकी तब्बल 2 हजार 182 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. यामुळे शहरातील अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या ही सद्यस्थितीला 1 हजार 698 इतकी आहे.

गुरुवारी दिवसभरात 1 हजार 733 जणांचे स्वॅब प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी 208 जणांचे पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यातील
नायडू रुग्णालय व पालिकेने उभारलेल्या आयसोलेशन सेंटरमध्ये तर 148 जण, खाजगी रुग्णायात 47 जण, तर ससून रुग्णालयात 13 जण उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. तत्पूर्वी, शहरात गेले दोन दिवस दिडशेच्या आसपास बाधितांची संख्या वाढली होती.

काल आणखी सात कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण अ‍ॅक्टिव्ह रूग्णांपैकी 169 रूग्णांची प्रकृती गंभीर असून, 44 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. काल कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सात जणांना अन्य आजाराने ग्रासलेले होते. ताडीवाला रस्ता परिसरातील 65 वर्षीय महिला, मार्केट यार्ड परिसरातील 64 वर्षीय महिला, येरवडा येथील 52 वर्षीय व्यक्ती, हडपसर येथील 50 वर्षीय महिला, बिबवेवाडी येथील 74 वर्षीय महिला, नागपूर चाळ परिसरातील 42 वर्षीय व्यक्ती, तर गंज पेठेतील 84 वर्षीय महिला या सात जणांचा यामध्ये समावेश आहे.

यातील एका महिलेचा भारती रुग्णालयात 19 मे रोजी मृत्यू झाला. तर तीन जणांचा मृत्यू 20 मे रोजी झाला. काल त्यांचे मरणोत्तर कोरोना तपासणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गुरुवारी सकाळी अकरा वाजेनंतर तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यातील रुग्णांना न्युमोनिया, उच्च रक्तदाब या आजारांसह कोरोनाची लागण झाली होती.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा