देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केले होते. लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व उद्योग,सेवा बंद होत्या. सरकारने रेल्वे सेवादेखील बंद ठेवली होती. परंतु आता हळहळू रेल्वे सेवा पूर्वपदावर येताना दिसत आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी २०० विशेष नॉन एसी रेल्वे सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्या रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षणही सुरू केले होते. आता त्या पाठोपाठ आता कॉमन सर्व्हिस सेंटरवरही तिकीट विक्री सुरू करणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली. आतापर्यंत ३० लाख मजुरांना श्रमिक रेल्वे द्वारे त्यांच्या गावी पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली.

कॉमन सर्व्हिस सेंटरवर तिकिट विक्रीसह आता काही ठराविक रेल्वे स्थानकांवरदेखील जाऊन रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण करता येणार आहे. सध्या देशातील १.७ लाख कॉमन सर्व्हिस सेंटरवर तिकिट विक्री सुरू करणार आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये प्रवाशांना ठराविक रेल्वे स्थानकांवरील तिकिट विक्री सुरू केली जाणार असून त्यासंदर्भात प्रोटोकॉल तयार केला जात असल्याचे गोयल म्हणाले.

यावेळी रेल्वेमंत्र्यांनी श्रमिक ट्रेनबाबतही माहिती दिली. आतापर्यंत २०५० पेक्षा अधिक श्रमिक रेल्वेद्वारे ३० लाखांपेक्षा अधिक प्रवासी मजूर त्यांच्या गावी परतले आमच्यासाठी हे खुप कठीण काम होते. परंतु आम्ही त्यात यशस्वी झालो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे यावर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.

“श्रमिक ट्रेन चालवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने सर्वात जास्त स्वारस्य दाखवले. बिहारने देखील उत्तम काम केले.ओडिशा आणि पश्चिम बंगालने श्रमिक रेल्वेची मागणी केली होती. परंतु अम्फान या वादळामुळे त्या ठिकाणची रेल्वेसेवा तात्पुरती स्थगित केली.२३ मे नंतर या ठिकाणी पुन्हा रेल्वे सेवा सुरू करण्यात येईल. काही राज्ये आताही आम्हाला सहकार्य करत नाहीयेत. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत केवळ ट्रेनच्या २७ फेऱ्या झाल्या,” असे ही गोयल यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा