नवी दिल्ली : देशांतर्गत विमान सेवा टप्प्याटप्प्याने २५ मे पासून सुरू होणार असल्याचे हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी नुकतेच जाहीर केले.विमान कंपन्यांकडून आकारण्यात येणाऱ्या तिकीट दरावर किमान आणि कमाल मर्यादा घालणार असल्याचे नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने सांगितले.एसओपी म्हणजेच स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स मंत्रालयाकडून जारी करण्यात आल्या, ज्यात तिकीट दरांचाही समावेश होता. यानुसार मुंबई ते दिल्ली विमान तिकीट किमान ३५०० ते कमाल १० हजार रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

मेट्रो ते मेट्रो शहराच्या प्रवासासाठी २०२० च्या उन्हाळ्यातील वेळापत्रकानुसार एक तृतीयांश म्हणजेच ३३.३३ टक्के विमानांना परवानगी दिली आहे. तर मेट्रो ते नॉन मेट्रो किंवा या उलट उड्डाणे १०० पेक्षा जास्त आहेत. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता या शहरांचा मेट्रो शहरांमध्ये समावेश होतो.

आतापर्यंत विमान कंपन्यांकडून किमान ते कमाल तिकीट दर संबंधित वेबसाइटवर दाखवला जायचा. पण आता विमान तिकीट परवडणारे असावे,असे हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले. दिल्ली ते मुंबईसाठी किमान तिकीट दर ३५०० ते कमाल तिकीट १० हजार रुपयांपर्यंत असेल.

विमान मार्गांचे वर्गीकरण ७ प्रकारांमध्ये केले आहे. यामध्ये ०-३० मिनिट, ३०-६० मिनिट, ६०-९० मिनिट, ९०-१२० मिनिट, १२०-१५० मिनिट, १५०-१८० मिनिट आणि १८० ते २१० मिनिट असं हे वर्गीकरण आहे.

व्यावसायिक विमान उड्डाणे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर २५ मार्चपासून बंद होती. पण आता केंद्र सरकारने विमान उड्डाणांना परवानगी दिली आहे. टप्प्याटप्प्याने ही सेवा सुरळीत केली जाणार असून विमानतळांना तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे प्रवासी आरोग्याच्या कारणास्तव प्रवास करू शकत नसतील ते कोणत्याही शुल्काविना त्यांचे तिकीट पुढे ढकलू शकतात,असे ही हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले.

सर्व प्रवाशांना सरकारच्या कोरोना विषाणू ट्रेसिंगवर नोंदणी करणे अनिवार्य आहे.आपण प्रवासासाठी सक्षम आहोत, कंटेन्मेंट किंवा रेड झोनमधून येत नाही, असे स्पष्टीकरण प्रवाशांना द्यावे लागेल. आरोग्य सेतू ऍपवर लाल श्रेणीतील प्रवाशांना प्रवास करता येणार नाही.

हवाई प्रवासासाठी हे नियम असतील

विमान उड्डाणाच्या नियोजित वेळेच्या दोन तास आधी प्रवाशांना विमानतळावर पोहोचावे लागेल.

प्रवाशांना मास्क आणि ग्लोव्हज घालणे बंधनकारक असेल.

पुढच्या चार तासांनी ज्यांचे विमान आहे, त्यांनाच फक्त टर्मिनल बिल्डींगमध्ये प्रवेश दिला जाईल.

टर्मिनल बिल्डींगमध्ये प्रवेश देण्याआधी प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग चाचणी करण्यात येईल.

१४ वर्ष वयोगटाच्या आतील मुलांसाठी आरोग्य सेतू अ‍ॅप बंधनकारक नाही. ज्यांच्या अ‍ॅपवर हिरवे चिन्ह येणार नाही, त्यांना विमानतळावर प्रवेश मिळणार नाही.

शक्यतो ट्रॉलीचा वापर टाळण्याचा प्रयत्न असेल. पण विनंती केल्यास ट्रॉली उपलब्ध करुन दिली जाऊ शकते.

टर्मिनलमध्ये प्रवेश करण्याआधी सामानाचे सॅनिटायझेशन केले जाईल.

काऊंटरवरील स्टाफला फेस शिल्ड घालावे लागेल किंवा काचमध्ये आवश्यक आहे.

सोशल डिस्टन्सिंग आणि अन्य नियमांबद्दल सातत्याने घोषणा केल्या जातील.

एअरपोर्ट स्टाफला पीपीई किट बंधनकारक आहे तसेच कर्मचारी आणि प्रवाशांसाठी सॅनिटायझर ठेवावे लागेल.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा