बंगाल, ओडिशात जोरदार पाऊस

पुणे/नवी दिल्ली : ‘अम्फान’ चक्रीवादळ बुधवारी पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकले. चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोलकातामध्ये अनेक इमारतींना वादळाचा तडाखा बसला. बंगालसह ओडिशात ताशी 100 किलोमीटर वेगाने वारे वाहत असून, जोरदार पाऊस सुरू आहे.

पश्चिम बंगालच्या दिघा आणि बांग्लादेशच्या हातियाच्या किनारपट्टीवर काल दुपारी अडीचच्या सुमारास चक्रीवादळ धडकले. सोसाट्याच्या वार्‍यासह आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरूवात झाली. वार्‍यामुळे अनेक झाडे आणि विजेचे खांब कोसळले. चक्रीवादळापूर्वीच राष्ट्रीय आपत्कालीन पथकाने पश्चिम बंगालमधून 5 लाख, तर ओडिशातील सुमारे दीड लाख लोकांची अन्यत्र व्यवस्था केली होती. बंगालच्या उपसागरात शनिवारी ‘अम्फान’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. त्यानंतर त्याची तीव्रता वाढत गेली. सोमवारी त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले. पश्चिम बंगालमध्ये काल सकाळी दहापासूनच वादळाचा प्रभाव वाढू लागला होता. दुपारी तीनच्या सुमारास वादळ किनारपट्टीवर धडकले. या वादळाचे केंद्र दिघापासून 65 किलोमीटर, तर बांग्लादेशाच्या सागर बेटापासून 35 किलोमीटर अंतरावर समुद्रात होते. ते ताशी 20 किलोमीटर वेगाने झेपावत होते. वादळामुळे ओडिशा परादीप आणि परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळी साडेआठपर्यंत परादीप येथे 82 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दुपारनंतर हे वादळ परादीपच्या किनार्‍यापासून उत्तरेकडे पश्चिम बंगालच्या किनार्‍याकडे सरकले. या वादळामुळे किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे वाहत होते. आकाशात 14 किलोमीटर उंचीपर्यंत दाट ढग जमा झाले होते. तसेच मुसळधार पावसाला सुरवात झाली होती. तर किनारपट्टीलगत 4 मीटर उंचीपर्यंत लाटा उसळत होत्या. सायंकाळच्या सुमारास वादळाची तीव्रता कमी झाली. आता हे वादळ उत्तरेकडे सरकत असून सिक्कीमसह ईशान्य भारतातील राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा