पश्चिम बंगालमध्ये बुधवारी आलेल्या महाचक्रीवादळ अम्फनने रौद्र रूप धारण केले असून आतापर्यंत ७२ जणांचा बळी घेतला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या चक्रीवादळाला कोरोना विषाणूपेक्षाही भयानक म्हटले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज अम्फन चक्रीवदाळामुळे पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख ५० हजार रूपयांच्या मदतीची घोषणाही यावेळी त्यांनी केली.

त्या म्हणाल्या,”आतापर्यंत इतके भयानक चक्रीवादळ मी कधीही पाहिले नव्हते.” सर्वाधिक मृत्यू झाडे पडल्यामुळे झाला आहे. ओडिशामध्येही तीन लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दोन्ही राज्यात बचाव कार्य सुरु आहे. तसेच बांगलादेशमध्ये या चक्रीवादळामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला.

अम्फन चक्रीवादळाने पश्चिम बंगाल व ओडिशामध्ये प्रचंड नुकसान झाले.या वादळामुळे समुद्र किनारी भागांमध्ये वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. कोलकाताच्या बऱ्याच भागामध्ये पाणी भरले. या वादळाचा फटका कोलकाता विमातळालाही बसला आहे. विमानतळ पाण्याखाली आहे. विमानतळाची धावपट्टी आणि हँगर पाण्याखाली बुडाले आहेत.

पश्चिम बंगालमधील दिघा व बांगलादेशातील हातिया येथे वादळाने बुधवारी दुपारी २.३० वाजता जमिनीला स्पर्श केला, त्यानंतरच्या झंझावातात बरीच झाडे, घरे उन्मळून पडली असून विद्युत खांबही कोसळली. राज्यात सुमारे ६ लाख ५८ हजार लोकांना दोन सुरक्षित ठिकाणी हलवले असून वादळाचा वेग सुरुवातीला ताशी १६०-१७० किमी होता तो नंतर १९० कि.मी झाला.

चक्रीवादळामुळे उद्भवणाऱ्या स्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) ४१ तुकडय़ा पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये तैनात केल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याशी संपर्क साधला. वादळाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा