मतकरी यांना श्रद्धांजली

पुणे : बालनाट्यापासून जागतिक रंगभूमीला गवसणी घालणारा असामान्य रंगकर्मी अशी रत्नाकर मतकरी यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने प्रतिभावान नाटककार, साहित्यिक गमावला असल्याची श्रध्दांजली मान्यवरांनी सोमवारी वाहिली.

उपजत प्रतिभा, प्रयोगशील वृत्ती आणि काळाबरोबर राहण्याचे भान या संचितामुळे रत्नाकर मतकरी यांनी प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर स्वत:च्या नावाची ठळक मुद्रा उमटवली.

दिलीप माजगावकर, संचालक- राजहंस प्रकाशन

रत्नाकर मतकरी यांचे जाणे धक्कादायक व अविश्वसनीय आहे. पंधरा दिवसांपूर्वीच आम्ही गप्पा मारल्या होत्या. टाळेबंदीनंतर मुंबईला आलात की घरी या, असे अगत्यपूर्ण निमंत्रण त्यांनी दिले होते. हे संभाषण शेवटचे ठरेल, असे वाटले नव्हते.

लक्ष्मीकांत देशमुख,माजी संमेलनाध्यक्ष.

रत्नाकर मतकरी यांच्याशी चार-पाच दिवसांपूर्वीच बोलणे झाले होते. त्यांच्याशी झालेली प्रत्येक चर्चा प्रेरणादायी असायची. त्यांना संगीत नाटक आणि कलाकारांबद्दल आस्था होती.

कीर्ती शिलेदार, माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष

रत्नाकर मतकरी अतिशय पारदर्शक स्वभावाचे होते. त्यांच्यावर समाजवादी विचारांचा प्रभाव होता. नर्मदा आंदोलनाला पाठिंबा देऊन त्यांनी आपली सामाजिक भूमिका स्पष्ट केली. त्यांनी बाल्यावस्थेत असलेल्या बालरंगभूमीला वेगळा आयाम दिला. मतकरी, नाडकर्णी आणि प्रभावळकर या त्रिकुटाने मिळून आशयघन निर्मिती केली.

सतीश आळेकर, नाटककार

रत्नाकर मतकरी यांनी व्यावसायिक आणि समांतर रंगभूमी सशक्तपणे सांभाळली. ते चळवळींशी बांधील होते. त्यामुळे त्यांचे ‘लोककला 78’ हे नाटक महत्त्वाचे ठरते. मी त्यांच्या ‘अचाट गावची अफाट मावशी’ आणि ‘निम्मा झिम्मा राक्षस’ या बालनाट्यामधून काम केले आहे. आमच्या ‘समाजस्वास्थ्य’ नाटकाच्या पन्नासाव्या प्रयोगावेळी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहून त्यांनी दाद दिली होती.

अतुल पेठे, दिग्दर्शक

रत्नाकर मतकरी यांनी बाल रंगभूमीला खर्‍या अर्थाने बळकटी दिली. त्यांच्या योगदानामुळेच बाल रंगभूमीची चळवळ उभी राहिली. त्यांना बर्‍याच वेळा भेयण्याचा योग आला. फोनवरूनही संवाद साधता आला. नाटकाप्रमाणेच त्यांचे बाल साहित्यातील योगदान विसरता येणार नाही.

डॉ. संगीता बर्वे, अध्यक्षा, अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्था.

रत्नाकर मतकरी हे पुण्यात सन २००१ मध्ये पार पडलेल्या १५ व्या अखिल भारतीय मराठी बाल कुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. बाल रंगभूमीसाठीही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. बाल रंगभूमी, व्यवसायिक रंगभूमी, कथा, कादंबर्‍या लिहिल्या आहेत. त्यांनी साहित्य क्षेत्रात सात दशके काम केले आहे. त्यांच्या रूपाने बाल साहित्यावर प्रेम करणारा साहित्यिक हरवल्याचे दु:ख आहे.

सुनील महाजन, सहकार्यवाह,अ.भा.मराठी बालकुमार संस्था.

अन् त्यांचे पुण्यात येणे टळले

अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे दर वर्षी एका ज्येष्ठ बाल साहित्यिकांना जीवन गौरव दिला जातो. मागील वर्षी रत्नाकर मतकरी यांना जीवन गौरव देण्याचा निर्णय संस्थेने घेतला होता. त्याबाबत संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी मतकरी यांच्याशी संवाद साधला. मात्र मतकरी यांनी संस्थेच्या पदाधिकार्‍यांना ‘मी यापुढे कोणतेच पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मला माफ करा. माझ्या ऐवजी बाल साहित्यात योगदान देणार्‍यांचा गौरव करावा.’ अशी सूचना केली. त्यांनी गौरव स्वीकारला असता, तर त्यांचे पुण्यात येणे झाले असते. आणि तोच पुण्यातील शेवटचा प्रवास ठरला असता.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा