मुख्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई, (प्रतिनिधी) : कोरोना विषाणू प्रादुर्भावानंतरच्या काळात शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामध्ये जागतिक स्तरावरही बदल होत आहेत. त्यामुळे आपल्याकडेही नियणित शैक्षणिक वर्ष सुरू होईल, अशा रीतीने शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार करा. शाळा सुरू झाल्या नाही तरीही शिक्षण सुरूच राहील. यासाठी शिक्षण आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिले.

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आगामी शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी शालेय शिक्षण, तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मुख्यमंत्री ठाकरे यांनी आढावा घेतला. या बैठकीत मुख्य सचिव अजोय मेहता, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय तसेच शिक्षण विभागाचे संचालक आदी वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की शाळा सुरू होणार नाहीत; पण शिक्षण सुरूच राहील, असे नियोजन करणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी चार भिंतींतील शाळा सुरू होऊ शकली, तर ऑनलाईन शिक्षण, डिजिटल माध्यमाच्या पर्यायांच विचार करावाच लागेल. विशेषतः कंटेन्मेंट झोनमधील शाळा बंद राहतील. हरित श्रेणीमध्ये शाळा सुरू करता येतील; पण श्रेणीची परिस्थिती बदलली तर अडचणी निर्माण होतील. महापालिका क्षेत्रांमध्ये हरित श्रेणी कमी आहेत. त्यामुळे हा मोठा प्रश्न आहे. शहरात इंटरनेट सेवा उपलब्ध असते. त्यामुळे या ठिकाणी ऑनलाईन, व्हर्च्युअल क्लासरूम्स पर्याय वापरता येईल. ग्रामीण भागात ग्रीन झोन जास्त आहेत; पण त्या ठिकाणी वेगवान इंटरनेट सेवा उपलब्ध करावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.

केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी टोपे यांची चर्चा

देशात सर्वांत प्रथम कोरोनाचे संकट आलेल्या केरळने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे. केरळ राज्याने कशाप्रकारे उपाययोजना राबविल्या आहेत, याची माहिती घेण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी केरळच्या आरोग्यमंत्री के. शैलजा यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. केरळमधील लोकसंख्येची घनता तेथील भौगोलिक, सामाजिक रचना आणि महाराष्ट्राची रचना यांत बर्‍यापैकी अंतर आहे; मात्र केरळच्या आरोग्य विभागाकडून जे काही अभिनव उपक्रम हाती घेण्यात आले आहेत त्याचा महाराष्ट्रात वापर करण्याविषयी विचारविनिमय केला जाईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. या वेळी आरोग्य विभागाचे सचिव खोब्रागडे हेही उपस्थित होते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा