मुंबई : कोरोनाने देशभरात थैमान घातले असून महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण आहेत. राज्यातील विविध विभागाच्या शिक्षक आणि शिक्षिकांना कोरोनाच्या या महामारीत टोल नाक्यावर, चेक पोस्टवर, शिक्षकांना दारू दुकानांच्या समोर रांगा लावायला सांगितले जाते. यासारखा शिक्षकांचा दुसरा अपमान नसून काही ठिकाणी तर दारूची तस्करी करणार्‍यांवर नजर ठेवायला नेमलेल्या पथकांमध्ये शिक्षकांचाही समावेश आहे. शिक्षकी पेशाची गरिमा नष्ट करणारे आणि शिक्षक म्हणून लाज आणणारी गोष्ट असल्याची खंत राज्य पुरोगामी शिक्षक फाऊंडेशनचे बाळासाहेब गोतारणे यांनी व्यक्त केली आहे. तसेच शिक्षकांना विविध परीक्षणातून वगण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

याबाबत गोतारणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांना निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नानासाहेब सदाशिव कोरे यांना लॉकडाऊनच्या कालावधीत डफळापूर ते अनंतपूर दरम्यानच्या शिंगणापूर नाक्यावर त्यांची नेमणूक केली. नाकाबंदी दरम्यान कोरे यांना एका भरधाव ट्रकने चिरडले. कोरे जागीच ठार झाले. ही अतिशय निंदणीय घटना आहे.

राज्यातील विविध शाळांमध्ये नागरिकांना क्वारंटाईन केलेले आहे. त्या ठिकाणी दिवसरात्र शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, स्वतःची काळजी कशी घ्यायची, काम कोणते ते कसे करायचे, याविषयी काहीही मार्गदर्शन नाही. गंभीर संकट काळात काहीच स्पष्टता नसल्याने शिक्षक भयंकर दहशतीखाली आहेत. क्वारंटाईन केलेले नागरिक शिक्षकांचे अजिबात ऐकत नाहीत. वाद घालतात, पळून जातात. शिक्षकांना जाब विचारला जातो. अशा वेळेस शिक्षक हतबल होत आहेत. जालना, वर्धा, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यासह इतर काही टोल नाक्यांवर, चेक पोस्टवर कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांना काही प्रवासी तसेच वाहनचालक शिवीगाळ करत, धमक्या देत आहेत. वर्धा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात दारूची तस्करी करणार्‍यांवर नजर ठेवायला नेमलेल्या पथकांमध्ये शिक्षकांचाही समावेश आहे. परिपाठात मुलांच्या रांगा करुन घेणार्‍या शिक्षकांना दारू दुकानांच्या समोर रांगा लावायला सांगितले जाते, याच्याइतका शिक्षकांचा दुसरा अपमान असू शकत नाही, असा संताप गोतारणे यांनी व्यक्त केला आहे.

कोरोनाच्या आपत्तीत शिक्षकांना मास्क, सेनीटाइझर, प्रवास करण्यासाठी पासेस, ओळखपत्र दिले नाही. त्यामुळे शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना विमा कवच देण्यात आले नाही. शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना आधार देण्यासाठी शिक्षण विभागातले अधिकारी पुढे येत नाहीत, असा अनेक शिक्षकांचा अनुभव आहे. निवडणुका असो की इतर कामे शिक्षक गप्प बसून अपमान, अवहेलना निमुटपणाने गिळत राहत आहेत. आपत्तीच्या काळातही शिक्षकांना कामे देताना प्रशासनाने विचार करायला हवा. शिक्षकांना करता येतील, अशीच कामे दिल्यास कोण विरोध करेन? नाकेबंदीसाठी पोलिसांसोबत होमगार्ड, वनकर्मचारी-शिपाई, खासगी कंपन्यांतले चौकीदार, सुरक्षा कर्मचारी, साखर कारखान्यांतले सुरक्षा कर्मचारी यांची नेमणूक करता येऊ शकते. शिक्षकांना असे काम देणे योग्य आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा