मुंबई, (प्रतिनिधी) : लॉकडाउनचा तिसरा टप्पा संपत आला तरी कोरोनाच्या रुग्णांमध्ये रोज मोठी वाढ होत आहे. त्यामुळे केंद्रीय पातळीवर काहीही निर्णय झाला, तरी राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. लॉकडाउन वाढवण्याबाबत गुरुवारी महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा झाली. मुंबई, पुणे व लाल श्रेणीत असलेल्या शहरातील निर्बंध अधिक वाढवले जाण्याची चिन्हे आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. लॉकडाउनचा तिसरा टप्पा १७ तारखेला संपणार आहे. लॉकडाउन वाढवण्याबाबत सर्व राज्यांनी स्थानिक परिस्थितीचा विचार करून सर्व राज्यांना १५ तारखेपर्यंत आराखडा सादर करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत. आज (शुक्रवारी) राज्याची भूमिका स्पष्ट केली जाणार असून, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. १७ मे नंतर लॉकडाउन सुरू ठेवले तरी अर्थचक्र सुरु रहावे, यासाठी आणखी काय काय करता येतील? याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. तसेच राज्याची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशींवरही बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

मुंबईवर लक्ष केंद्रित करणार

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २७ हजारांच्या पुढे गेली आहे. यातील सुमारे १७ हजार रुग्ण एकट्या मुंबई शहरात आहेत.त्यांची संख्याही वाढत आहे. लॉकडाउनचा चौथा टप्पा जाहीर करताना हरित व नारंगी भागातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करतानाच मुंबईसह लाल भागातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही कठोर निर्णय घेण्याचे संकेतही सरकारकडून दिले गेले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा