संजय ऐलवाड

पुणे : कोरोनाचा पर्यटन क्षेत्रास सुमारे तीन लाख कोटींचा फटका बसू शकतो! पर्यटन क्षेत्रात सुमारे साडे चार कोटी लोक काम करतात. तर, त्यांच्यावर 12 कोटी लोक अवलंबून आहेत. मात्र, कोरोनामुळे या क्षेत्रातील अडीच ते 3 कोटी लोकांवर बेकारीची कुर्‍हाड कोसण्याची शक्यता आहे. यामध्ये पर्यटन क्षेत्राशी निगडीत असलेल्या पर्यटन कंपन्या, गाईड, हॉटेल्स, कार चालक, प्रत्यक्ष पर्यटन स्थळी असणारे छोटे हॉटेल्स चालक, खाद्यपदार्थ विक्रेते आदींचा समावेश असू शकतो.

ऑफबीट डेस्टिनेशनचे नितीन शास्त्री म्हणाले, लॉकडाउननंतरही लोक पर्यटनासाठी बाहेर पडणार नाहीत. त्यामुळे 25 टक्के कामगारांच्या नोकर्‍या जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात पर्यटन क्षेत्राचा मोठा वाटा आहे. 2018 मध्ये या व्यवसायामुळे केंद्राच्या तिजोरीत 16.91 लाख कोटींची भर पडली. त्यावेळी देशाच्या विकासात पर्यटन उद्योगाचा वाटा 9.2 टक्के होता. 2017 मध्ये भारतात येणार्‍या परदेशी पर्यटकांची संख्या 1 कोटी 17 लाख होती; तर देशांतर्गत पर्यटकांची संख्या 1,657.55 दशलक्ष एवढी होती.

देशातील पर्यटक उत्तर भारतातील पर्यटन स्थळांना पसंती देतात. त्यात हिमालय, झारखंड, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, मनाली, नैनिताल, दार्जिलिंग आदींचा समावेश आहे. राज्यात महाबळेश्वर, कोकणातील समुद्र किणारे, गड, किल्ले, अंजिठा-वेरूळ आदीसह शिर्डी, शेगाव, अक्कलकोट आदी धार्मिक स्थळाला भेटी देणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे.

चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या मते, कोरोनामुळे पर्यटनाशी संबंधित सर्वच घटकांना फटका बसला आहे. जवळपास वर्षभरातील सर्व टूर्स पर्यटकांनी रद्द केल्या आहेत. परिणामी ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर्स, हॉटेल्स, उपहारगृहे, कार व बस चालविणारे, गाईड्स या वर्गाला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. या क्षेत्रातील 25 टक्के कामगारांच्या नोकर्‍या जाण्याची शक्यता आहे.

शास्त्री म्हणाले, ऑनलाईन आरक्षण करून देणार्‍या कंपन्यांकडून ग्राहकांची लूटमार आणि फसवणूक केली जात आहे. ट्रॅव्हल एजंट/टूर ऑपरेटर यांच्यासमोर ऑनलाईन आरक्षण करणार्‍या कंपन्यांचा भस्मासुर उभा आहे. या हंगामात ज्या टूर कंपन्या भारतात आणि भारताबाहेर पर्यटक नेण्याचा व्यवसाय करत आहेत त्यांची अवस्था खूप गंभीर झाली आहे. ज्या पर्यटकांनी प्रवासाचे बेत केले होते ते आता पैसे परत मागत आहेत. ट्रॅव्हल एजंटकडून आगाऊ पैसे घेणार्‍या विमान कंपन्या आणि हॉटेल्स आता मात्र आगाऊ दिलेले पैसे परत देण्यास ठेंगा दाखवत आहेत. पर्यटक कंपन्या 3 महिन्यांनी आपापले प्रवास सुरु करतील, जगात सर्वत्र छोट्या सहलींना प्राधान्य दिले जाईल, म्हणजेच देशांतर्गत पर्यटनाला चालना मिळेल.

एरवी भारतात पर्यटकांची संख्या लक्षणीय असते. देशातील सुमारे 30 लाख पर्यटक थायलंड, सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया आदी देशात पर्यटनासाठी जातात. इंग्लंड, अमेरिका, ऑॅस्ट्रेलिया, न्युझीलंड, दुबई आदी देशातही भारतीय पर्यटक जातात. चीन, इराण, इराक, जर्मनी या देशात जाणार्‍या पर्यटकांची संख्या अत्यल्प आहे. या देशात केवळ उद्योगपती आणि व्यावसायिक जात असतात.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा