मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर आठही उमेदवार विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले. सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती आज अधिकाऱ्यांनी दिली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी तीन वाजेपर्यंत होती. त्यानंतर अधिकृत निकालाची घोषणा झाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, भाजपचे रणजीतसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडाळकर, प्रवीण दाटके आणि रमेश कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांसाठी निवडणूक होणार होती. मात्र, राज्यावर कोरोनाचे संकट गहिरे झाल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः प्रयत्नशील होते.

आता उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राज्य विधी मंडळाच्या एका सभागृहाचे सदस्य झाले आहेत. ते पहिल्यांदाच विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणार आहेत. गेल्या वर्षी उद्धव ठाकरे यानी नोव्हेंबरमध्ये राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. ते राज्य विधी मंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे प्रतिनिधी नसल्याने २७ मे २०२० पूर्वी त्यांना एका सभागृहाचे सदस्य होणे गरजेचे होते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा