मुंबई, (प्रतिनिधी) : भाजपमधील अंतर्गत वाद बुधवारी पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांमधील जाहीर आरोप-प्रत्यारोपामुळे चव्हाट्यावर आला. एकनाथ खडसे यांना सात वेळा आमदारकी, दोन मंत्रिपद आणि सुनेला खासदारकी दिली; अजून किती द्यायचे असा सवाल करताना, त्यांनी आता ’मार्गदर्शक’ व्हावे, असा टोला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. तर, चंद्रकांत पाटील दोन वर्षांपूर्वी भाजपमध्ये आले असून, भाजपमधील त्यांचे योगदान शून्य आहे, अशा शब्दांत खडसे यांनी प्रतिहल्ला चढवला. विधान परिषदेसाठी उमेदवारी नाकारल्यामुळे खडसे यांनी पक्ष नेतृत्वावर जाहीर टीका केली. तिकीट कापण्यामागे प्रदेशस्तरावरील नेत्याचा हात असून, आपल्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. चंद्रकांत पाटील यांनी काल आरोपांना प्रत्युत्तर दिले.

खडसेंनी खंजीर खुपसला नाही का?

हरिभाऊ जावळे यांना पक्षाने लोकसभेचे उमेदवारी जाहीर केली होती. पण, खडसेंनी त्यांचे तिकीट कापून सुनेला उमेदवारी मिळवून दिली. जावळे यांचे तिकीट कापून खडसे यांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला नव्हता का? आजवर अनेकांना डावलून घरात तिकिटे दिली, त्यावेळी त्यांनी त्या कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला नाही का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. हरिभाऊ जावळे, गुरुमुख जगवाणी यांची तिकिटे कापताना खडसेंनी त्यांना जसे समजावले, तसेच त्यांनी आता स्वत:लाही समजावले पाहिजे, असा टोलाही पाटील यांनी लगावला. निष्ठावंतांना डावलून काल-परवा पक्षात आलेल्या लोकांना सध्या पदे, उमेदवार्‍या दिल्या जातात, हा खडसे यांचा आरोपही पाटील यांनी फेटाळून लावला. आपण आणीबाणीपासून संघर्ष केला असे खडसे सांगतात. प्रत्यक्षात ते 1987-88 मध्ये भाजपमध्ये आले असल्याचा पाटील यांनी उल्लेख केला.

खडसेंचे पाटलांना प्रत्युत्तर

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या हल्ल्याला खडसे यांनी तिखट शब्दात प्रत्युत्तर दिले. चंद्रकांत पाटील यांनी वर्षानुवर्षे भाजपच्या विद्यार्थी परिषदेचे काम पाहिले आहे. दोन वर्षांपूर्वी ते भाजपमध्ये आले. त्यामुळे भाजपमध्ये पूर्वी काय घडले त्यांना माहिती नाही. भाजपमधील त्यांचे योगदान शून्य आहे, अशा शब्दात खडसे यांनी प्रदेशाध्यक्षांना फटकारले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा