सोलापूर : सोलापुरात सध्या संचारबंदी अमल ज्या पद्धतीने सुरू आहे, त्याच्या वेळापत्रकात किंवा कार्यपद्धतीत कोणताही बदल सध्यातरी विचारात नाही. १७ मे नंतर लॉकडाऊन सुरू राहणार की आणखीन शिथिलता मिळणार याबाबत शासन जो निर्णय घेईल त्याप्रमाणे अंमलबजावणी होईल असे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, सोलापुरात सध्या ५२ भाग प्रतिबंधित करण्यात आले आहेत. ज्या इमारतीत किंवा गल्लीमध्ये हे रुग्ण मिळून येत आहेत तेवढाच भाग आता प्रतिबंधित केला जात आहे. प्रतिबंधित भागातील मुख्य रस्तेही सार्वजनिक वाहतुकीसाठी अडवून ठेवले जाणार नाहीत याची खबरदारी घेतली जात आहे.सध्या सोलापुरात अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी प्रतिबंधित क्षेत्रात काही वेळा निश्चित करून शिथिलता दिली जाते,अशीच शिथिलता शहराच्या इतर भागातही वेळा निश्चित करून देण्यात आली आहे. आता यामध्ये कोणताही बदल करण्याबाबत सध्यातरी कोणताही प्रस्ताव नाही, विचारही झालेला नाही.

काटेकोर संचारबंदी किंवा चार दिवस सर्व सवलती रद्द, शंभर टक्के संचारबंदी लावली जाणार अशा चर्चा काहीजण पसरवत आहेत. त्यांचा हेतू तपासावा लागेल असे सांगून पोलीस आयुक्त म्हणाले, या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही. लॉकडाऊन संबंधात सरकारकडून कोणत्या सूचना येतात याच्या प्रतीक्षेत प्रशासन आहे. योग्य वेळी योग्य निर्णय सर्वांना कळवले जातील. तोपर्यंत आहेत ते सर्व नियम जनतेने काटेकोरपणे पाळावेत असे आवाहनही अंकुश शिंदे यांनी केले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा