रणजितसिंह मोहिते, गोपीचंद पडळकर, दटके, गोपछडे यांना विधान परिषदेची उमेदवारी

मुंबई, (प्रतिनिधी) : विधानसभेची उमेदवारी न मिळालेल्या व उमेदवारी मिळून पराभूत झालेल्या एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे अशा दिग्गजांना डावलून भाजपने लोकसभा व विधानसभेच्या तोंडावर पक्षात आलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीनाथ पडळकर यांना, तसेच नागपूरचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके, डॉ. अजित गोपछडे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. या चौघांनीही शुक्रवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेले पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आयारामांना झुकते माप दिल्याबद्दल तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली.

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होत आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार आघाडीच्या पाच व भाजपच्या चार जागा निवडून येतील, अशी स्थिती आहे. चार जागांसाठी भाजपमध्ये २५ इच्छुक होते. विधान परिषद निवडणुकीत पराभूत झालेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे, विधानसभेत उमेदवारी मिळू न शकलेले एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांच्याबरोबरच हर्षवर्धन पाटील यांनीही जोर लावला होता. परंतु, या सर्वांना डावलून भाजपने बाहेरून आलेल्या दोघांसह दोन नवीन चेहर्‍यांना संधी दिली आहे. भाजपचे सरचिटणीस अरूणसिंग यांनी दिल्लीत उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. नागपूरचे माजी महापौर व भाजप नागपूर शहर अध्यक्ष प्रवीण दटके, माजी खासदार व माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे संयोजक डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे

एका दगडात अनेक पक्षी…

अजित गोपछडे यांची संघाची पार्श्वभूमी असून त्यांनी यापूर्वी नांदेड लोकसभा निवडणूकही लढवली आहे. बहुजन समाजातील एक अभ्यासू नेता म्हणून त्यांना संधी मिळाली, तर नागपूरचे महापौर राहिलेले प्रवीण दटकेही संघाच्या मुशीत तयार झालेले आहेत. धनगर समाजाचे नेते म्हणून धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेवर बहिष्कार घालणार्‍या गोपीचंद पडळकर यांना भाजपने बारामती विधानसभेसाठी अजित पवार यांच्याविरोधात रिंगणात उतरवले होते. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपमध्ये दाखल झालेल्या अकलूजच्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनाही संधी देण्यात आली आहे.

खडसेंचा संताप

विधान परिषदेसाठी उमेदवारी नाकारल्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. पक्षासाठी आयुष्यभर खस्ता खाणार्‍या लोकांना डावलून आत्ता पक्षात आलेल्या लोकांना संधी दिली जात आहे. यामुळे पक्ष कुठे जातोय हे स्पष्ट दिसते आहे, अशी टीका खडसे यांनी केली. खडसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच होती. पण पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेवर पाठवून त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. मात्र, दिल्लीचे नेतृत्व अजूनही त्यांच्यावर नाराज असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. यानिमित्ताने राजकीय विरोधकांवर कुरघोडी करण्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. एकनाथ खडसेंचे तिकीट कापून पक्षाने खडसेंच्या राजकारणाला जवळपास पूर्णविराम दिल्याचे बोलले जात आहे.

भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या विधान परिषदेच्या चारही उमेदवारांनी काल मुंबईत विधान भवनात निवडणूक अर्ज दाखल केले. भाजप उमेदवार प्रवीण दटके, रणजितसिंह मोहिते पाटील, डॉ. अजित गोपछेडे व गोपीचंद पडळकर यांनी अर्ज दाखल केले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री विनोद तावडे व आशिष शेलार, भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड आणि मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा