हडपसर वाहतुक पोलिसांकडून ११३ वाहनांवर कारवाई

पुणे : लॉकडाऊनमध्ये नियम शिथील केल्यानंतर शहरातील नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. तसेच, सर्वसामान्य नागरीकांना इंधन उपलब्ध करून दिल्यामुळे बरीच वाहने रस्त्यावर येऊ लागली आहे. परंतु, इंधन उपलब्ध करून दिल्यानंतरही नागरिकांना रस्त्यावर वाहने घेऊऩ येण्यास वाहतूक शाखेने मनाई केली आहे. त्यामुळे मागील दोन दिवस रस्त्यांवर येणार्‍या वाहनांवर वाहतुक शाखेने कारवाई करून वाहने जप्त केली आहेत. तसेच, वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

हडपसर येथील मांजरी फाट्यावर असलेल्या तपासणी नाक्यावर व हडपसर वाहतूक शाखेने मंगळवारी ७३ तर, बुधवारी ५३ असे ११३ गुन्हे दाखल केले आहेत. तर, ७३ वाहनांवर कारवाई करून ती जप्त केली आहेत. यामध्ये ११ चारचाकी,६तीनचाकी आणि ५६ दुचाकी अशा ७३ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच, दुचाकीवरून डबल व ट्रीपल सीट जाणार्‍या दुचाकी चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. येत्या काळात ही कारवाई आणखी कडक करण्यात येणार असून, नागरीकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

फोनवर मागणी स्विकारून सिगारेट विकणार्‍या दोघांवर गुन्हे

पुणे : लॉकडाऊऩचा फायदा घेऊऩ पानटपरी चालकांकडे उपलब्ध असणार्‍या वस्तू दुप्पट तिप्पट दराने विक्री होत असल्याचा प्रकार शहरात सर्वत्र सुरू आहे. त्यासाठी फोनवरून मागणी स्विकारून वस्तू योग्य व्यक्तीपर्यंत पोहचवली जात आहे. अशाच प्रकारे फोनवरून मागणी स्विकारून सिगारेट घेऊन जाणा़र्‍या दोघांवर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हे शाखेच्य खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी त्यांच्याकडून २ लाख ७ हजारांची सिगारेट जप्त केली आहे. नसीम नुरमहंमद शेख (वय: ४२) आणि महंमद इस्तेखार अब्दुल गफार शेख (वय :२०,दोघेही रा, खराडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

लॉकडाऊनचा फायदा घेऊन सिगारेट महागड्या दराने विकणारे दोघे माल घेऊऩ छुप्या पद्धतीने खराडी येथे जाणार असल्याची माहिती पोलिस कर्मचारी अमोल पिलाणे यांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी खराडी येथील रॉयल पान शॉप येथे छापा टाकला. त्यावेळी नसीम आणि महंमद हे फोनवर सिगारेटची ऑर्डर स्विकारून जास्त किंमतीने सिगारेट विक्री करत असल्याची माहिती समोर आली. खराडी येथील आयटी कंपनीत काम करणार्‍यांना ही सिगारेट विक्री केली जात असल्याची माहिती तपासामध्ये समोर आली आहे. पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

पोलिसांसोबत हुज्जत घालणार्‍याकडे सापडला गांजा

पुणे : संचारबंदी असूनही दुचाकीवरून फिरत असलेल्या युवकाला अडवताच, त्याने आरडाओऱडा करून तेथील बॅरिकेटवर डोके आपटले. तसेच, हुज्जत घालून दगड डोक्यात मारून घेतला. या झटापटीत त्याच्या खिशातील गांजाची पुडी पडली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. हडपसर येथील मांजरीफाटा येथील तपास नाक्यावर हा प्रकार घडला. महंमद प्यारे शेख (वय २२ , कोंढवा) असे गांजा सापडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी वाहतुक शाखेने त्याला हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले. मांजरी फाटा येथे हडपसर वाहतुक शाखेचे पथक कारवाई करत होते. त्यावेळी गर्दीतून वेगाने दुचाकी घेऊन जाणार्‍या एकाला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला अडवल्यानंतर बॅरीकेटवर डोके आपटून घेतले आणि तेथे पडलेला दगड उचलून स्वतःच्याच डोक्यात आपटला. यावेळी पोलिसांनी त्याला धरल्यानंतर त्यांने झटापट केली. त्यावेळी त्याच्या खिशातील गांजाची पुडी पडली. त्यावेळी वाहतुक पोलिसांनी त्याला गांजाच्या पुडीसह हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले.

मद्यविक्रीचे वार्तांकन करणार्‍या पत्रकारास मारहाण

पुणे : राज्यात दारुविक्रीस सुरूवात झाल्यानंतर सर्वत्र मद्य खरेदीसाठी लांबलचक रांगा पाहायला मिळत आहेत. राज्यभर सुरू असलेल्या या प्रकाराचे सर्वच माध्यमांनी चित्रीकरण व वार्तांकन केले. मात्र, रस्त्यावर मद्यासाठी लागलेल्या रांगेचे छायाचित्र काढण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला चौघांनी मारहाण करून त्याला जखमी केले. बिबवेवाडी येथे मंगळवारी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला. भूषण गरूड असे मारहाणीत जखमी झालेल्या पत्रकाराचे नाव आहे. बिबवेवाडी भागात पत्रकार भूषण गरुड हे मद्यासाठी रांग लागलेली असताना छायाचित्र काढत होते. त्यावेळी तेथे असलेल्या चार जणांच्या टोळक्याने त्यांना शिवीगाळ केली. तसेच, त्यांच्या अंगावर धावून जात, त्यांना मारहाण केली. या घटनेत गरूड हे जखमी झाले. गरूड यांच्यावर खासगी रूग्णालयात
उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मद्यखरेदीसाठी पैसे न दिल्याने शिक्षक पत्नीला मारहाण

पुणे : लॉकडाऊनचे नियम शिथील केल्यानंतर राज्यात सर्वत्र मद्यविक्री सुरू केली आहे. मद्य खरेदीसाठी सर्वत्र लांबलचक रांगादेखील लागल्या. मात्र, याच मद्यखरेदीसाठी पैसे न दिल्यामुळे एकाने शिक्षक पत्नीवर फरशी फेकून तिला मारल्याचा धक्कादायक प्रकार कर्वेनगर येथील हिंगणे होम कॉलनीमध्ये मंगळवारी घडला.या प्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात ३० वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून अक्षय चंद्रकांत पवार (वय : ३१) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार महिला या शिक्षिका असून,आरोपी हे बेरोजगार आहेत.आरोपीने तक्रारदार महिलेकडे आरोपीने पैसे मागितले. त्यावेळी तक्रारदार महिलेने आरोपीस पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी त्याने घराच्या कामासाठी आणलेल्या टाईल्सच्या फरशीचे तुकडे तक्रारदार महिलेच्या दिशेने
फेकून मारले. यावेळी फरशीचा एक तुकडा तक्रारदार महिलेच्या हातावर लागल्यामुळे त्यांच्या हाताला मोठी जखम झाली. पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव हे पुढील तपास करत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा