मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर केले. देशात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आणि त्यातही मुंबईत आहेत. मुंबई खालोखाल यांत पुण्याचा देखील क्रमांक लागतो. या दोन्ही शहरात परिस्थिती चिंताजनक आहे. लॉकडाउन ४० हून अधिक दिवस झाले असून राज्यातील १४ हून अधिक जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. मात्र आता निर्बंध शिथील केले जात असून जनजीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लॉक डाऊन नंतरही लोकांना काळजी घ्यावी लागणार आहे. याचा परिणाम गणेशोत्सवावरही होण्याची शक्यता आहे.

गणेशोत्सव आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक प्रतीक आहे. महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवा दरम्यान विशेषत: मुंबई, पुणे येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते. गणेश चतुर्थीपर्यंत परिस्थिती सामान्य होईल असा विश्वास वाटत आहे. दुसरीकडे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीदेखील गणेशोत्सव कोणत्याही परिस्थितीत साजरा होईल असा आत्मविश्वास व्यक्त करत आहे. मात्र यावेळी गणेशोत्सव नेहमीप्रमाणे साजरा न होता अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेंद्र दहीबावकर यांनी सर्व मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने तयारी करण्यास सांगितले. पण दरवर्षीप्रमाणे थाटामाटात न करता अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जाईल असे ही त्यांनी मंडळांना सांगितले. “काही वर्षांपूर्वी प्लेगची साथ आली होती. त्यानंतरही लोकांना आपल्या घरी गणपतीची मूर्ती आणून साधेपणाने ११ दिवस गणेशोत्सव साजरा केला होता,” असे नरेंद्र दहीबावकर यांनी सांगितलं आहे.

“गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने लोकांचा तसंच कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालणं योग्य नाही. संकटाच्या काळात गणेशोत्सव मंडळांनी नेहमीच प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम केले. गेल्या काही दिवसांपासून पोलीस तसेच पालिकेवर मोठा ताण आहे. यामुळे यावेळीही गणेश मंडळे आपली मदतीची परंपरा कायम ठेवणार आहेत. लोकांना कमी गर्दी करण्याचं आवाहन करण्यात येणार असून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे,” अशी माहिती नरेंद्र दहीबावकर यांनी दिली आहे.

दुसरीकडे मंडळांनी मात्र ‘वेट ऍण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. लॉकडाऊनमुळे बऱ्याच गणेश मूर्तीकारांनाही आपले काम अद्याप पूर्ण करता आलेले नाही. यामुळे आता गणेशोत्सव साजरा होणार की नाही याकडे भक्तांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा