मुंबई : हसतमुख, सदाबहार, हुरहुन्नरी, चतुरस्र आणि ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. मागच्या दोन वर्षांपासून ते कर्करोगाशी लढा देत होते. त्यांच्या पश्चात पत्नी नीतू कपूर, मुलगा रणबीर कपूर, मुलगी रिद्धीमा कपूर असे कुटुंब आहे.

श्वसनाच्या त्रासामुळे ऋषी कपूर यांना मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावत गेली आणि काल सकाळी ८.४५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारी सव्वा चारच्या सुमारास चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. अंत्यसंस्कारावेळी राजीव कपूर, रणधीर कपूर, नीतू कपूर, सैफ अली खान, करीना कपूर, आलिया भट्ट, अभिषेक बच्चनसह मोजकेच लोक सामील झाले होते. ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर अंत्यसंस्कारासाठी सामील होऊ शकली नाही. रिद्धिमा दिल्लीत राहते. गृहमंत्रालयाने तिला मुंबईला जाण्याची परवानगी दिली. मात्र, हवाई प्रवास नाकारला. आता ती रस्ता मार्गाने मुंबईत येणार आहे.

ऋषी कपूर यांना २०१८ मध्ये कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. मध्यंतरी, त्यांनी परदेशात जाऊन उपचार करून घेतले होते. यानंतर सप्टेंबर २०१९ मध्ये ऋषी कपूर भारतात परतले होते. अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीबद्दल फिल्म फेअर, राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

अवघ्या तीन वर्षांचे असताना ऋषी कपूर यांनी ’श्री ४२०’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून काम केले. तर राज कपूर दिग्दर्शित ’मेरा नाम जोकर’मधून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल ठेवले. यानंतर ’बॉबी’ या चित्रपटाने ऋषी कपूर यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले. १९८३ ते २००० या काळात त्यांनी जवळपास ९२ चित्रपटात रोमँटिक भूमिका केल्या. यापैकी ३६ चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप चालले. ‘दामिनी’, ‘सरगम’, ‘प्रेमरोग’, ‘लैला मजनू’, ‘रफू चक्कर’, ‘चांदनी’ ’दो दुनी चार’ या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. ’अमर अकबर अँथोनी’, ’कुली’, ’कर्ज’ या चित्रपटांमधून त्यांनी एकाहून एक अशा सरस भूमिका साकारल्या. कारकीर्दीच्या उत्तरार्धात ऋषी कपूर यांनी चरित्र अभिनेते म्हणून ओळख मिळवली. ‘हम तुम’, ‘फना’, ‘नमस्ते लंडन’, ‘लव आजकल’, ‘पटियाला हाउस’, ‘अग्निपथ’, ‘हाऊसफूल टू’, ’कपूर अ‍ॅण्ड सन्स’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल चित्रपटसृष्टीसह अनेक क्षेत्रांतील ज्येष्ठांनी श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषी कपूर अत्यंत प्रेमळ आणि चैतन्यशील होते, ते प्रतिभेचे ऊर्जास्थान होते, असे ट्विट केले आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी देशाने प्रिय मुलगा गमावला आणि चित्रपटसृष्टीने रत्न गमावला, अशी भावना व्यक्त केली. स्वरसम्राज्ञी यांनी काय बोलू, काय लिहू… वेदना असह्य आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा